Fri, Jul 03, 2020 18:54होमपेज › Jalna › पीकविमा योजनेमुळे कंपन्या मालामाल; शेतकरी कंगाल !

पीकविमा योजनेमुळे कंपन्या मालामाल; शेतकरी कंगाल !

Published On: Jul 04 2018 2:13AM | Last Updated: Jul 04 2018 2:09AMजाफराबाद : प्रतिनिधी

शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा करणारे सरकार प्रत्यक्षात प्रधानमंत्री फसल बिमा योजनेद्वारे शेतकर्‍यांना फसवून विमा कंपन्यांची झोळी भरत असल्याचे चित्र आहे. काही शेतकर्‍यांच्या खात्यात दोन रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत विमा जमा झाल्याने शेतकर्‍यांची टिंगल उडवली जात आहे.

तालुक्यातील शेतकर्‍यांनी पिकांचे निसर्गाच्या लहरीपणापासून संरक्षण व्हावे, म्हणून शंभर रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत पीक विम्याचा भरणा केला होता. त्यानुसार नुकसान भरपाई म्हणून बँकांमध्ये पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात येत आहे, परंतु काही शेतकर्‍यांच्या नावे अपेक्षित तर काहींना एक, आठ, शंभर, दोनशे, पाचशे, हजार रुपयांची रक्कम जमा होत असल्याचे उघडकीस आले आहे. पीकवीमा भरल्याच्या पावत्या व किती पैसे भरले याच्या पावत्या शेतकर्‍यांकडे असूनदेखील कमी पैसे कसे जमा झाले, हा प्रश्‍न शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. 

यासाठी शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकर्‍यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करा, अशा सूचना शासनाच्या वतीने बँकांना देण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही बँकांनी रक्कम जमा केलेल्या नसल्याने शासनाच्या आदेशालाही बँका जुमानत नाही का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.