Mon, Jul 06, 2020 15:48होमपेज › Jalna › कमी दरामुळे कपाशी लागवड घटणार 

कमी दरामुळे कपाशी लागवड घटणार 

Published On: May 28 2018 1:43AM | Last Updated: May 27 2018 11:05PMभोकरदन : प्रतिनिधी

तालुक्यात  गतवर्षी कापसावर पडलेली बोंडअळी आणि मिळालेला अत्यल्प भाव यामुळे यंदा कापूस लागवडीचे क्षेत्र घटण्याचा अंदाज कृषी विभागाहसह शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपाशी लागवड केली जाते. मका, सोयबीननंतर दुसरे नगदी पीक म्हणून परिसरातील अनेक गावे हे कपाशीला प्राधान्य देत असतात. तालुक्यात जवळपास सर्वच शेतकर्‍यांचे आर्थिक गणित हे कपाशीवर अवलंबून असते. मात्र मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर सर्वत्र बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांचे जवळपास साठ ते सत्तर टक्के उत्पन्न घटले होते. शेतकरी बर्‍याच अडचणीत आला होता. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्‍यांचे पूर्ण आर्थिक गणितच चुकले होते. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर रडकुंडीला आला होता. कपाशीवर बोंडअळी मोठ्या प्रमाणावर झाली असल्यामुळे यंदा कपाशी लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

यावर्षी आता पासूनच शेतकरी कोणते पीक लागवड करावी याचा विचार करीत आहेत. त्यामुळे बोंडअळीमुळे झालेले नुकसान पाहता यावर्षी शेतकरी कपाशी लागवड करण्यास फार उत्सुक नसल्याचे दिसत आहेत. शेतकर्‍याचा कल हा मका, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी अशा विविध नगदी पिकांकडे वाढला आहे. शेतकरी यावर्षी पांढर्‍या सोन्याला फार पसंती देईल ही शक्यता खूपच कमी आहे.