Mon, Jul 06, 2020 06:47होमपेज › Jalna › भोकरदन पालिकेला आली जाग

भोकरदन पालिकेला आली जाग

Published On: Feb 15 2018 2:28AM | Last Updated: Feb 15 2018 2:15AMभोकरदन : प्रतिनिधी

शहराला व इतर पंचवीस गावांना पाणीपुरवठा करणार्‍या दानापूर येथील जुई धरणातून रात्रीचा अवैध पाणी उपसा होत असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने दि. 11 फेब्रुवारीच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर नगरपालिकेला जाग आली.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी वीज कंपनीला दि. 13 फेब्रुवारी रोजी पत्र दिले असून जुईधरण परिसरातील 500 मीटरपर्यंतचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्याची मागणी केली आहे. शहराला व इतर काही गावांना पाणीपुरवठा करणार्‍या या जुई धरणातून परिसरातील काही शेतकरी पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षाची संधी साधून रात्रीचे पाणी चोरी करीत असल्याची माहिती होती. धरणाची देखरेख करणार्‍या पाटबंधारे विभागाचे कायम दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. त्या पाठोपाठ शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यावर या पाणी चोरीमुळे मोठा परिणाम होणार असतानादेखील नगरपालिका प्रशासन झोपतच असल्याचे दिसून येत होते.  भोकरदन शहरावर मागच्या काही वर्षांपासून सतत पाणीटंचाईचे सावट येत आहे, यावर्षी मात्र शहरवासीयांच्या नशिबाने जुई धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणात पाणीसाठा असला तरी त्याचा काही शेतकरी अवैध मार्गाने बेसुमार उपसा करीत असल्याने पाणीटंचाईचे संकट कधीही येऊ शकते, अशी शक्यता आहे. 
भविष्यातील पाणीटंचाईला दूर करायचे असेल नगर पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलून अशा पाणी चोरीला आळा घालण्याची मागणी करण्यात येत होती. शहरासह 25 गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. सध्या टंचाई परिस्थितीत शेतीसाठी पाणी उपशावर बंदी घालून पाणी वाचविण्याची मागणीही समोर येत होती. दरम्यान नगरपालिकेने वीज कंपनीचे उपअभियंता यांना पत्र दिले असून या पत्रामध्ये भोकरदन शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी जुई मध्यम प्रकल्प दानापूर येथील उपलब्ध पाणीसाठा जून 2018 पर्यंत शिल्लक रहावा, यासाठी जलाशय परिसरातील 500 मीटरपर्यंतचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य कारवाई करावी, असेही महावितरणला दिलेल्या पत्रात  म्हटले आहे.