Sun, Sep 27, 2020 03:51होमपेज › Jalna › भारिप बहुजन महासंघाचे ‘जोडे मारो’ आंदोलन

भारिप बहुजन महासंघाचे ‘जोडे मारो’ आंदोलन

Published On: Dec 11 2018 1:39AM | Last Updated: Dec 10 2018 11:58PM
जालना :  प्रतिनिधी 

भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केलेल्या वक्तव्याचा तसेच पोलिस उपअधीक्षक भाग्यश्री नवटाके या महिला पोलिस अधिकार्‍याने केलेल्या विधानाचा भारिपच्या वतीने सोमवारी (दि. 10) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडेमारो व निदर्शने आंदोलन करण्यात आले. 

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिलीप कांबळे यांनी बाळासाहेब आंबेडकर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे बिनबुडाचे आरोप करून राज्यातील व देशातील तमाम दलित, वंचित, अल्पसंख्याक, आदिवासी समजाच्या भावना दुखावल्या आहेत. देशातील वंचिताना न्याय देण्याचे काम करणार्‍या बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोपामुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपअधीक्षक भाग्यश्री नवटाके या प्रशासनातील महिला अधिकारी यांनी जातीयवादाच्या नव्या संकल्पनांना जन्म दिला आहे. अशा अधिकार्‍याकडून जातीय द्वेश पाळला जात असल्यामुळे त्या अधिकार्‍याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्यावर मानहानीचा व समाजात अशांतता निर्माण कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकार्‍याकडे  करण्यात आली.   निवेदनावर  दीपक डोके, मंदा निर्सगन, रमा  होर्शिळ, विनोद दांडगे, बाळासाहेब रत्नपारखे, अकबर इनामदार आदीच्या स्वाक्षर्‍या आहेत.