Mon, Jul 06, 2020 09:01होमपेज › Jalna › जालन्यात भाजप शिवसेनेचे वर्चस्व

जालन्यात भाजप शिवसेनेचे वर्चस्व

Published On: Sep 08 2019 1:36AM | Last Updated: Sep 08 2019 7:32PM
 सुहास कुलकर्णी

विधानसभेसाठी जालना, परतूर, भोकरदन, घनसावंगी व बदनापूर हे पाच मतदारसंघ आहेत. जिल्हा पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्‍ला म्हणून ओळखला जात असे. मात्र, हा बालेकिल्‍ला भाजप-शिवसेना युतीने ताब्यात घेतला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार रावसाहेब दानवे हे साडेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले.  2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत घनसावंगी वगळता चारही मतदार संघांत युतीचे उमेदवार निवडून आले आहेत. पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघ युतीकडे असतानाच मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेत शिवसेना व राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. जिल्ह्यातील चारपैकी तीन नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहेत, तर एक भाजप व काँग्रेस आघाडीच्या ताब्यात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे.   

2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाचपैकी चार विधानसभा मतदार संघांतून आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते. युतीला केवळ बदनापूरच्या एका जागेवर समाधान मानावे लागले. जालना विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे भास्कर आंबेकर यांचा 20 हजार 771 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत शिवसेनेचे भास्कर आंबेकर व गोरंट्याल यांच्यात झाली. भोकरदन विधानसभा मतदार संघातून भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत दानवे यांनी 1 हजार 639 मतांनी पराभव केला. चंद्रकांत दानवे यांना 67 हजार 480, तर निर्मला दानवे यांना 65 हजार 841 मते मिळाली. या निवडणुकीत 16 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. बदनापूर विधानसभा मतदार संघात झालेल्या तिरंगी लढतीत शिवसेनेचे संतोष सांबरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदामराव सदाशिवे यांच्यात लढत झाली. यात सांबरे यांनी सदाशिवे  यांचा 18 हजार 908 मतांनी पराभव केला. सांबरे यांना 56 हजार 242, तर सदाशिवे यांना 37 हजार 334 मते मिळाली. या मतदार संघातून मनसेचे रूपकुमार चौधरी यांनी 35 हजार 908 मते घेतली. घनसावंगी मतदार संघात राष्ट्रवादीचे राजेश टोपे व शिवसेनेचे अर्जुनराव खोतकर यांच्यात सरळ लढत झाली. यात टोपे यांनी खोतकर यांचा 23 हजार 307 मतांनी पराभव केला. टोपे यांना 1 लाख 4 हजार 206, तर खोतकर यांना 80 हजार 899 मते मिळाली. खोतकर हे जालना मतदार संघाऐवजी प्रथमच घनसावंगी मतदार संघातून लढले. परतूर मतदार संघातून काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया यांनी बबनराव लोणीकर यांचा 11 हजार 502 मतांनी पराभव केला. या मतदार संघात 11 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत जेथलिया व लोणीकर यांच्यात झाली. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत आघाडीला युतीने जोरदार झटका दिला. मागील निवडणुकीच्या उलटे चित्र यावेळी पाहावयास मिळाले. या निवडणुकीत पाचपैकी चार विधानसभा मतदार संघांतून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले. तर घनसावंगी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने राखला. 

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य, भाजपची महाजनादेश तर शिवसेनेच्या जनाशीर्वाद यात्रेमुळे आगामी निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भोकरदन मतदार संघात अनेक स्थानिक नेत्यांनी भाजपमधे प्रवेश केला असला, तरी जिल्ह्यात एकही मोठा नेता अद्याप भाजप अथवा शिवसेनेच्या गळाला लागलेला नाही.