Mon, Jul 06, 2020 14:20होमपेज › Jalna › आंबेडकरी तरुणांनी नक्षलवादाकडे  झुकू नये

आंबेडकरी तरुणांनी नक्षलवादाकडे  झुकू नये

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 12 2018 11:29PMजालना : प्रतिनिधी

नक्षलवादी हे आंबेडकरी असू शकत नाही. आंबेडकरी तरुणांनी नक्षलवादाकडे झुकू नये, असे मत सामाजिक केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केले. 
यावेळी आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकीचे पत्र पाठविण्यात आले आहे. या प्रकारात विरोधी पक्षाने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे होते. मात्र विरोधकांनी या घटनेचेही राजकारण केले. विरोधकांना राजकारणासाठी इंधनवाढ, नोटबंदी, जीएसटीसह इतर विषय होते. मात्र विरोधक चुकीच्या पद्धतीने राजकारण करीत आहेत. भीमा कोरेगाव दंगल व एल्गार परिषदेचा संबध नाही. भीमा कोरेगाव प्रकरणात कायदा सर्वात मोठा आहे. 

संभाजी भिडे यांच्याबाबत आठवले म्हणाले की, ते संविधानाच्या विरोधात बोलत असल्याने त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. आंबा खाल्ल्याने मुलगा होतो, असे सांगून ते अंधश्रद्धा पसरवीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. जालना जिल्हाधिकारीपदाबाबत आठवले म्हणाले की, दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारीपदाचा जो गोंधळ सुरू होता तो कशामुळे झाला हे मला माहिती नाही. मात्र अधिकार्‍यांना कामाचे स्वातंत्र्य मिळावयास हवे. अधिकार्‍यांनीही लोकप्रतिनिधींची कामे करणे गरजेचे आहे. दोघांमध्ये सुसंवाद असल्यानंतरच विकासाचे व जनतेचे प्रश्‍न मार्गी लागणार आहे. काँग्रेस व भाजपच्या काळातही दलित अत्याचार सुरूच आहे. दलित अत्याचार प्रकरणात तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. दलित अत्याचार करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, असेही आठवले म्हणाले.

मागासवर्गीय महामंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यात 500 ते 1000 लोकांना कर्ज मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी या महामंडळास बजेट वाढवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे, ते म्हणाले. पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पार्टीचे अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, गणेश रत्नपारखे, सतीश वाहुळे, गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शिवसेना युतीतून बाहेर पडल्यास नुकसान : महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत शिवसेनेशी युती व्हावी, अशी आपली इच्छा आहे. त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहे. ते लवकरच या विषयावर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहेत. रिपब्लिकन पक्ष शिवसेना व भाजपसोबत राहून निवडणूक लढविल्यास फायदा होणार आहे. मात्र शिवसेना युतीतून बाहेर पडल्यास त्यांचे नुकसान होईल, असे भाकितही आठवले यांनी वर्तविले.