Fri, Jul 03, 2020 19:16होमपेज › Jalna › जिल्ह्याला १७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट 

जिल्ह्याला १७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट 

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 16 2018 12:21AMजालना : सुहास कुलकर्णी 

राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जुलै महिन्यात जिल्ह्यातील विविध प्रशासकीय विभागांना   17 लाख 22 हजार 240 झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अर्धा जुलै महिना संपत आलेला असतानाच केवळ दहा टक्के एवढेच वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही हे अभियान कागदावरच राहणार असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात गतवर्षी 8 लाख 50 हजार 712 वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात प्रादेशिक वन विभाग कार्यालयास 1 लाख 50 हजार, सामाजिक वनीकरण विभागास 1 लाख 10 हजार, ग्रामपंचायतींना 2 लाख 92 हजार 269, कृषी विभाग 1 लाख 52 हजार 173, नगरविकास व नगर परिषदांना 1 हजार 25, सहकारी संस्था (सहकारी साखर कारखाना व मार्केट कमेटी) 25 हजार, स्वयंसेवी संस्था 57 हजार 900, जिल्हा उद्योग विभाग 10 हजार यांच्यासह इतर विभागांना 8 लाख 50 हजारांचे उद्दिष्ट वाटून देण्यात आले होते. 

जिल्हा प्रशासनाचे वृक्षप्रेम जुलै महिना सुरू होताच जागे होेते. विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने वृक्ष दिंडीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळकरी मुलांच्या हातात वृक्ष जगवा, वृक्षवल्‍ली आम्हा सोयरे या व यासारखे फलक देऊन व घोषणा देत कार्यक्रम होतो.

शासनाचा लाखो रुपयांचा निधी वृक्ष लागवडीसाठी खर्च होत असतानाच जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे क्षेत्र 2 टक्क्यांवरून पुढे सरकत नाही. कुर्‍हाडबंदी केलेल्या या जिल्ह्याच्या ठिकाणी आठ ते दहा सॉ मील कशा चालतात? त्यांना लाकूड कोठून येते? याबाबत वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना लक्ष देण्यास वेळ नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला वृक्ष लागवडीच्या फार्सबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे.