Mon, Jul 06, 2020 09:08होमपेज › Jalna › जिल्ह्यात 24 अहिल्यादेवी होळकर समाजभवने

जिल्ह्यात 24 अहिल्यादेवी होळकर समाजभवने

Published On: Mar 07 2018 2:43AM | Last Updated: Mar 07 2018 2:04AMजालना : प्रतिनिधी

धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यात 24 अहिल्यादेवी होळकर समाजभवन उभारण्यात येणार असल्याची माहिती धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा. कलिप दहेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रा. दहेकर म्हणाले की, धनगर समाज संघर्ष समितीच्या माध्यमातून खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, अर्थ व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत, तालुक्यांत, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर समाजभवन उभारण्यासाठी शासनाच्या वार्षिक अर्थसंकल्पात निधी तरतूद करण्याकरिता सकारात्मक चर्चा करण्यात आली. खा. डॉ. महात्मे यांनी अगोदर राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात भेटी देऊन गावातील पाहणी केली. यावेळी त्यांना धनगर वस्ती, गावात रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, विद्युत पुरवठा, समाजभवन आदी सुविधांचा अभाव दिसून आला.

आजही ग्रामीण भागात विमुक्‍त व भटक्या जमाती विकासापासून वंचित आहे. यामुळे खासदार डॉ. महात्मे यांनी मुख्यमंत्री व वित्त व अर्थमंत्री धनगर वस्ती व अन्य मागास गावांच्या विकास कामांकरिता अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. शासनाने या अर्थसंकल्पात निधी तरतूद करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली आहे. यामुळे राज्यात 390 अहिल्यादेवी होळकर समाजभवन उभारण्यात येईल. यापैकी जिल्ह्यात 24 गावांचा समावेश आहे. पत्रकार परिषदेला भगवान माथले, अ‍ॅड. सुरेश देशमुख, सुनील कानोड, ज्ञानदेव मापारे, शोभाताई मतकर, विठ्ठळ सातपुते, दत्ता खोमणे यांची उपस्थिती होती.