Mon, Jul 06, 2020 15:25होमपेज › Jalna › कृषी विभागाच्या शेतीचीच दुरवस्था

कृषी विभागाच्या शेतीचीच दुरवस्था

Published On: Sep 07 2018 12:56AM | Last Updated: Sep 07 2018 12:56AMभोकरदन : विजय सोनवणे 

कृषी विभागाच्या कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या 48 एकर शेतीचे देखभालीअभावी शेतात पीक कमी आणि गवतच जास्त दिसत आहे. या शेतीवर लाखो रुपये होणारा खर्चही वाया जात आहे. 

जालना रस्त्यावर कृषी विभागाच्या कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राची सुमारे 48 एकर शेती आहे. या शेतीमधील उत्पन्नामधून शासनाला काही मिळो किंवा नाही हा उद्देश नाही. शेतकर्‍यांना चांगली शेती करता यावी या साठी या शेतीच्या माध्यमातून येथील शेतीवर शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करीत आहे. शेतीची निगा  राखली जात नसल्याचा आरोप परिसरातील शेतकरी करीत आहे. शेतीमध्ये कृषी विभागाने सोयाबीन पिकांची लागवड केली आहे. सोयाबीन पीक कमी अन् तणच (गवत) जास्त आहे. 

कोणता आदर्श घ्यावा

एकूणच कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येते. 48 एकर शेतीचे हाल झाले आहेत. शासनाच्या शेतीतील सोयाबीन पीक गवताखाली दबले गेले आहे. कृषी खात्याकडून शेतकर्‍यांनी शेती करण्यासाठी कोणता आदर्श घ्यावा हा प्रश्‍न पडला आहे.

काम मात्र शून्य

कृषी विभागाच्या या 48 एकर शेतीचा व शेतकर्‍यांसाठी असलेल्या प्रशिक्षण केंद्राचा विचार केला तर या ठिकाणी शेतकर्‍यांना कोणताच फायदा होत नसल्याचे दिसत आहे. कृषी विभागाचे कृषी चिकित्सालय व प्रशिक्षण केंद्र केवळ कागदावरच असल्याचा आरोप आहे. कृषी चिकित्सालय कार्यालयाच्या जबाबदार अधिकार्‍याचे पद रिक्त आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे मंडळ अधिकारी विशाल साळवे यांच्याकडे आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी चिकित्सालय व प्रशिक्षण केंद्राकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.  

जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी करून कारवाई करावी

कृषी विभागाच्या चिकित्सालय व प्रशिक्षण केंद्राच्या शेतीची व सोयाबीनची झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.

अधिकार्‍यांचे दुर्लक्ष, औरंगाबादहून अप-डाऊन 

तालुका कृषी अधिकारी कार्यालय व चिकित्सालय तसेच प्रशिक्षण केंद्राचा कारभार पाहणारे बहुतांश अधिकारी, कर्मचारीच अपडाऊन करतात. त्यामुळे 48 एकर शासकीय शेतीची वाट लागत आहे.