Fri, Jul 03, 2020 20:08होमपेज › Jalna › शहरात नवीन सॅटेलाइट सेंटर सुरू होणार

शहरात नवीन सॅटेलाइट सेंटर सुरू होणार

Published On: Aug 20 2018 1:36AM | Last Updated: Aug 20 2018 1:27AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्याचे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने नवीन स्किल डेव्हलपमेंटसारखे 25 व्यावसायिक कोर्स सुुरू करण्यात येणार आहे. यासाठी 25 एकर जमीन विकत घेण्यात येणार आहे. 17 सप्टेंबर रोजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते लवकरच जागेचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली. भोकरदन नाका परिसरातील निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

दानवे म्हणाले की, या कोर्सेससाठी औरंगाबाद रोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ असलेली सर्वे क्र 278 मधील 25 एकर जमीन निश्‍चित करण्यात आली आहे. आयसीटी महाविद्यालयानंतर सुरू होणार्‍या या नवीन सॅटेलाइट सेंटरमुळे जिल्ह्याचे शैक्षणिक मागासलेपण दूर होण्यास मदत मिळणार आहे. जेईएस महाविद्यालयातही विद्यार्थ्यांसाठी बी होप  यांसह नवीन कोर्स सुरू करण्यात आला  आहे. या व्यावसायिक अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सेमिस्टर जॉइन करून ते सोडताही येणार आहे. पुन्हा सेमिस्टर जॉइन करावयाचे असल्यास तसे करता येणार आहे. विद्यापीठ व केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात येणार्‍या या कोर्ससाठी अंदाजीत 100 कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे. त्यात दोन इमारती, मुला-मुलींसाठी वसतिगृह, प्लेसमेंट सेंटर, सभागृह, अतिथीगृह आदी इमारती बांधण्यात येणार आहे. 

याच रस्त्यावर ड्रायपोर्ट असल्याने या भागाचा विकास होणार आहे. सोमवारी या बाबत जिल्हाधिकारी या जथमनीची पाहणी करण्यात येणार आहे. जिल्ह्याचा शैक्षणिक बॅकलॉग भरून येण्यास या कोर्सेसमुळे मदत मिळणार आहे.आयसीटी महाविद्यालयासाठी चारशे कोटींचा निधी खर्च होणार असून याच शैक्षणिक वर्षात आयसीटी सुरू होणार असल्याने त्याचाही फायदा जालन्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे. जालन्यात सुरू होणार्‍या या विविध कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू होणार्‍या या कोर्सेसमुळे विद्यापीठाची एक शाखा म्हणून या कोर्सेसकडे पाहिले जाणार असल्याचेही दानवे यांनी सांगितले.