होमपेज › Jalna › जिल्ह्यातील 45 गावांची वीज खंडित

जिल्ह्यातील 45 गावांची वीज खंडित

Published On: Feb 23 2018 1:31AM | Last Updated: Feb 23 2018 1:31AMजालना : प्रतिनिधी

वीज थकबाकी असलेल्या जिल्ह्यातील 45 गावांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. 2245 ग्राहकांकडे 4 कोटी 21 लाखांची थकबाकी असल्याने ही कारवाई झाली आहे.
औरंगाबाद परिमंडळअंतर्गत जालना जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून वसुलीसाठी संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करणेबाबत कारवाई चालू आहे. कारवाईअंतर्गत जिल्ह्यातील जालना विभाग-1  व 2 अंतर्गत वाढती थकबाकी वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहिमेंतर्गत तीन ते चार वषार्र्ंपासून वीज  देयके  न  भरलेल्या 2245  ग्राहकांचा  वीजपुरवठा खंडित करण्यात  आला  असून त्यांच्याकडे 4 कोटी 21 लाख 88 हजार थकबाकी आहे. थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून महावितरणकडे पर्याय नसल्याने जिल्ह्यातील 45 गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे. 

अंबडमध्ये 14 गावे अंधारात
अंबड तालुक्यातील वीज ग्राहकांकडे  11 कोटी 31 लाख वीज बिल बाकी असून थकबाकी पोटी 14 गावांची वीज महावितरणने खंडित केली आहे. त्यामुळे 14 गावे अंधारात बुडाली आहेत. अंबड तालुक्यात थकीत विज बिलापोटी महावितरणने वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहिम हाती घेतली आहे. मार्च एंड व महावितरण कंपनीला 6 कोटी वसुलीचे टार्गेट असल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.  वडीगोद्री महावितरण केंद्राअंतर्गत  मठ तांडा, चंदनापुरी, रेनापुरी, दोदडगाव, बारसवाडा वस्ती, नाझरकर वस्ती, दह्याळा, भांबेरी व डोणगाव वस्तीवरील दोन रोहित्रांवरील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.  शहागड महावितरण केंद्रा अंर्तगत गोंदी, जालोरा, करंजळा, कुरण, आपेगाव, डोमलगाव या गावांची वीज खंडीत करण्यात आली आहे. 

या गावातील वीजपुरवठा खंडित
घनसावंगी तालुक्यातील घाणेगाव, लिंबी, गणेशनगर, नागोबाची वाडी, उकडगाव मुद्रेगाव, नाथनगर, रवना, बोरगाव तांडा, घोंशी तांडा, जोगलादेवी, कोठी, श्रीकृष्णानगर तांडा, गणेशनगर तांडा, शेवता. यात एकूण 850 ग्राहक असून त्यांच्याकडे दीड कोटीची थकबाकी आहे. 

वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईस सामोरे न जाता थकबाकीदार ग्राहकांनी लवकरात लवकर वीजबिल भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.

महाकाळा, साष्टपिंपळगाव, बळेगाव, चुर्मापुरी, गोरी, दिशानगरी, भगवाननगर या गावांनी महावितरणला गावे आकडेमुक्त करुन व  बिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे. 
- एस. एस. उकंडे, शाखा अभियंता