Fri, Jul 03, 2020 18:00होमपेज › Jalna › जिल्ह्यात 33 लाख 22 हजार वृक्षांची होणार लागवड

जिल्ह्यात 33 लाख 22 हजार वृक्षांची होणार लागवड

Published On: Jul 02 2018 1:43AM | Last Updated: Jul 01 2018 10:30PMजालना : प्रतिनिधी

वाढते प्रदूषण रोखून पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी 1 ते 31 जुलैदरम्यान वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात आली. यादरम्यान जिल्ह्यात 33 लाख 22 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींना प्रत्येकी 1 हजार 500 रोपे वाटप करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शासकीय कार्यालयासह ग्रामपंचायती कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.   

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, राज्यात तीन वर्षांमध्ये 50 कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 ते 31 जुलै या कालावधीत 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येईल. जिल्ह्यात 36 लाख 22 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.  वाढती लोकसंख्या तसेच शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे.  वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा र्‍हास होत असून यामुळे जागतिक स्तरावर उष्णतेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे, जल व  वायू प्रदूषण वाढत असून त्याप्रमाणात वृक्ष लागवड न होता त्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. 

जिल्ह्यात एकूण 85 शासकीय रोपवाटिका असून जवळपास 40 लक्ष रोपे या रोपवाटिकेत उपलब्ध आहे.  या व्यतिरिक्त खासगी रोपवाटिकेत जवळपास 14 लाख रोपटे उपलब्ध आहे. वृक्षलागवडीसाठी मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध ठरवून देण्यात आला होता.  वृक्षलागवड हा उपक्रम केवळ शासनाचा आहे. ही मानसिकता समाजाने बदलली पाहिजे. वृक्षांचे आपल्या जीवनाशी निगडित असलेले महत्त्व प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. वृक्षलागवडीकडे प्रत्येकाने सामाजिक जाणिव, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. जालना पोलिस प्रशिक्षण केंद्र व राज्य राखीव दल जालना येथे मोठ्या प्रमाणात मोहीम राबविली जाणार असून जवळपास 50 हजार खड्डे खोदून तयार आहे असे यावेळी सांगितले.