Mon, Jul 06, 2020 08:27होमपेज › Jalna › नऊ महिन्यांत वीजचोरीची ३६०३ प्रकरणे उघडकीस

नऊ महिन्यांत वीजचोरीची ३६०३ प्रकरणे उघडकीस

Last Updated: Feb 24 2020 1:26AM
जालना : पुढारी वृत्तसेवा

महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलात गेल्या नऊ महिन्यात 3 हजार 603 वीज चोरांवर कारवाई करण्यात आली.  या ग्राहकांनी 3 कोटी 86 लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले असून सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

वीज चोरी पकडण्यासाठी महावितरण सातत्याने वीजचोरीविरोधात मोहीम राबविते. यात आकडे  टाकून वीज चोरणार्‍यांवर धडक कारवाई केली जाते. औरंगाबाद परिमंडलात एप्रिल-2019 ते डिसेंबर-2019 या नऊ महिन्यांत मोठ्या संख्येने वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली.

यात औरंगाबाद शहर मंडलात 576, औरंगाबाद ग्रामीण मंडलात 2,379 तर जालना मंडलात वीज चोरीची 648 प्रकरणे उघडकीस आली.  एकूण 3603 प्रकरणात विजेच्या अनधिकृत वापराची 232 प्रकरणे उघडकीस आली. तर मीटरमध्ये छेडछाड करून, आकडा टाकून थेट वीज चोरी केल्याची 3371 प्रकरणे आहेत. या सर्व ग्राहकांना 3 कोटी 86 लाख रुपये वीज चोरीची बिले देण्यात आली.  वीज चोरांविरोधातील धडक मोहीम यापुढेही सुरु राहणार आहे. नागरिकांनी अधिकृत जोडणी घेऊन विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.