होमपेज › Jalna › जिल्ह्यात भरपावसाळ्यात 16 प्रकल्प कोरडेठाक !

जिल्ह्यात भरपावसाळ्यात 16 प्रकल्प कोरडेठाक !

Published On: Jul 12 2018 1:40AM | Last Updated: Jul 12 2018 1:40AMजालना : सुहास कुलकर्णी 

जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे भरपावसाळ्यात 64 लघु व मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल 16 प्रकल्प कोरडे पडले आहेत. प्रकल्पात केवळ 3.27 टक्के उपयुक्‍त जलसाठा असल्याने तहानलेल्या जिल्ह्याला आता मोठ्या पावसाची गरज आहे. 

7 लघु व 64 मध्यम प्रकल्पांपैकी 1 मध्यम व 15 लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. जुलै महिन्यात मोठा पाऊस न झाल्याने जिल्ह्यात परिस्थिती भयावह आहे. लघुप्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून 34 प्रकल्पांतील पाणी पातळी जोत्याखाली गेली आहे. केवळ आठ प्रकल्पांत 0 ते 25 दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पांपैकी 5 प्रकल्पांत 0 ते 25 दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. 

तहानलेल्या जिल्ह्याला आता मोठ्या पावसाची गरज आहे. आजपर्यंत केवळ 157 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. काही गावांत मुसळधार तर लगतच्या गावात पाऊस नसल्याचे चित्रही या वर्षी पाहावयास मिळत आहे. असमान पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. पाऊस नसल्याने अनेक भागांत जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. भरपावसाळ्यात जिल्ह्यात दीडशेच्या वर टँकर धावताना दिसत आहेत. असेच चित्र राहिल्यास टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात मोठ्या पावसाची गरज आहे.