Mon, Jul 06, 2020 08:50होमपेज › Jalna › दहावीची तोंडी परीक्षा होणार बंद

दहावीची तोंडी परीक्षा होणार बंद

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 21 2018 1:00AMजालना : प्रतिनिधी

शाळांमधील अंतर्गत गुणांच्या किंवा तोंडी परीक्षेच्या आधारे दहावीच्या निकालामध्ये दिसणार्‍या उंच उड्या बंद करण्याच्या दृष्टीने राज्यमंडळाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या वर्षापासून दहावीच्या विद्यार्थ्यांची सामाजिक शास्त्रांसाठी घेण्यात येणारी तोंडी परीक्षा बंद होणार असून, त्यामुळे सहज मिळणार्‍या पैकीच्या पैकी गुणांना कात्री लागणार आहे.

याऐवजी विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्राची शंभर गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामध्ये 60 गुण हे इतिहास, राज्यशास्त्र यांच्यासाठी आणि 40 गुण हे भूगोल अशी विभागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भाषेप्रमाणेच सर्व विषयांसाठीही कृतिपत्रिका म्हणजेच पुस्तकांतील पाठांपेक्षा विषयाच्या वापरावर आधारित प्रश्‍न असणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना आपल्या भोवतालाच्या आकलनाला उत्तरामध्ये मांडावे लागणार असल्याने परीक्षेत खरा कस लागणार आहे.

सर्व विषयांसाठी कृतिपत्रिका यापूर्वी भाषा विषयांसाठी मंडळाने कृतिपत्रिका लागू केल्या आहेत. पाठामधील माहितीच्या आधारे प्रश्‍न विचारण्याऐवजी विद्यार्थ्यांना माहितीचा वापर करावा लागेल, असे प्रश्‍नांचे स्वरूप असते. इतिहासात संकल्पना चित्र पूर्ण करणे, घटना कालानुक्रमे मांडता येणे, घटनांमधील संदर्भाच्या अनुषंगाने ओघतक्‍ता तयार करता येणे, उतार्‍यावरील प्रश्‍न, घटनांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मत मांडता येईल, असे प्रश्‍न यामध्ये विचारण्यात येतील. संकल्पनांबरोबरच अनुभवावर आधारित प्रश्‍न कृतिपत्रिकेत असणार आहेत. उदाहरणार्थ, वारली चित्रशैलीतील चित्र देऊन त्याचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांनी त्याची वैशिष्ट्ये मांडणे, निवडणूक प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मत मांडण्यास सांगणे अशा स्वरूपाचे प्रश्‍न यामध्ये असणार आहेत.  विज्ञान विषयात आकृतीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्‍न विचारणे, आकृत्यांवरून भौतिकशास्त्रातील संकल्पना स्पष्ट करणे, अशा स्वरूपाची प्रश्‍नरचना राहणार आहे.