Tue, Jun 15, 2021 13:01होमपेज › International › ज्योतीच्या 'या' धाडसाचे इवांका ट्रम्पकडूनही कौतुक 

ज्योतीच्या 'या' धाडसाचे इवांका ट्रम्पकडूनही कौतुक 

Last Updated: May 23 2020 10:13AM

इवांका ट्रम्पज्योतीचा वडिलांसाठी गुरुग्राम ते बिहार सायकलवरून प्रवास 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

लॉकडाऊनच्या काळात गुरुग्राममधून आपल्या जखमी वडिलांना सायकलवर मागे बसवून दरभंगा (बिहार) येथे आणणाऱ्या ज्योतीचे कौतुक होत आहे. सगळीकडे ज्योतीची चर्चा होत असताना आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्पनेदेखील ज्योतीचे ट्विटरवरून कौतुक केले आहे. 

इवांकाने ट्विट करून म्हटले की, १५ वर्षांची ज्योती कुमारी आपल्या जखमी वडिलांना सायकलवरून सात दिवसांमध्ये १,२०० कि.मी. दूर असणाऱ्या आपल्या गावामध्ये घेऊन गेली. सहनशक्ती आणि प्रेमाच्या या वीरकथेने भारतीय लोकांचे आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे लक्ष तिने आपल्याकडे केंद्रित केले आहे. 

ज्योतीच्या धाडसाचे कौतुक भारतीय सायकलिंग फेडरेशननेदेखील केले आहे. ज्योतीच्या साहसाचे कौतुक सर्वत्र होत आहे. तिची कामगिरी बघून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीदेखील ज्योतीला एक लाख रुपयांची  मदत देण्याची घोषणा केली आहे. 

गुरुग्राममधून दरभंगापर्यंतचा प्रवास 

कोरोना संकटामुळे देशभरात मागील देशव्यापी लॉकडाऊनमध्ये अनेक प्रवासी मजूर पायी आपल्या घराच्या दिशेने रवाना झाले आहेत. ज्योतीचे वडील एका घटनेत जखमी झाले होते. त्यासाठी ते स्वत: गावापर्यंत येण्यास समर्थ नव्हते. अशा परिस्थितीत ज्योतीने आपल्या वडिलांना घरी घेऊन येण्याचा निर्णय घेतला आणि १० मे रोजी ती आपल्या वडिलांना घेऊन गुरुग्रामहून सायकलने निघाली. 

सात दिवसांत पोहोचली घरी

ज्योती प्रवास करून अखेर १६ मे रोजी आपल्या घरी पोहोचली. रस्त्यात येणाऱ्या तमाम अडचणी पार करत ती सात दिवसांनी आपल्या घरी पोहोचली. या काळात अनेक लोकांनी तिची मदत केली. ज्योती म्हणते की, ते रात्री पेट्रोल पंपाजवळ थांबत होते आणि मग सकाळी पुढचा प्रवास करायचे.

सायकलिंग फेडरेशनने ट्रायलसाठी बोलावलं

ज्योतीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, 'सायकलिंग फेडरेशनकडून फोन आला होता आणि त्यांनी मला ट्रायलसाठी बोलावलं. जर संधी मिळाली तर नक्कीच जाईन. परंतु, आता माझे लक्ष पुढच्या शिक्षणावर आहे. सध्या मी खूप थकले आहे.' 

लॉकडाऊननंतर दिल्ली जाऊन ट्रायल देणार आहे आणि शिक्षणाबरोबर सायकलिंगदेखील करायची इच्छा असल्याचे ज्योतीने म्हटले आहे.