Fri, Oct 30, 2020 07:55होमपेज › International › भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्प म्हणतात,फेसबुकवर 'मी नंबर वन' तर पंतप्रधान मोदी...

भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्प म्हणतात,फेसबुकवर 'मी नंबर वन' तर पंतप्रधान मोदी...

Last Updated: Feb 18 2020 1:57AM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २२ फेब्रुवारी रोजी पहिल्या भारत दौर्‍यावर येत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प गुजरातच्या अहमदाबाद शहरातून आपल्या भारत भेटीची सुरुवात करणार आहेत. या दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये आपण किती नंबरला आहोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कितव्या नंबरला आहेत याचा खुलासा केला आहे. 

या ट्विटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिलं की, "मार्क झुकेरबर्गने काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की, डोनाल्ड ट्रम्प फेसबुकवर नंबर वन आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मी दोन आठवड्यांनतर भारतात जाणार आहे."

मध्यंतरी एका अहवालानुसार, सर्वाधिक फॉलो केले जाणारे पहिले नेते ठरले आहेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा. त्यांचे एकूण १८.२७ करोड फॉलोअर्स आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जगातील दुसरे नेते ठरले आहेत. त्यांचे फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एकूण ११.०९ करोड फॉलोअर्स आहेत. 

सोशल मीडियावरील राजकीय नेत्यांच्या लोकप्रियतेत मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनादेखील मागे टाकले आहे. ट्रम्प यांचे एकूण ९.६ करोड फॉलोअर्स आहेत. दरम्यान, ट्रम्प हे ट्विटरवरील सर्वाधिक फॉलो केले जाणारे दुसरे नेते ठरले आहेत.

गतवर्षी जाहिर करण्यात आलेला हा अहवाल पाहता, ट्रम्प यांनी केलेले हे आजचे ट्विट मार्क झुकेरबर्ग यांच्या म्हणण्यानुसार आहे की, त्यांच्या मनातल्या  झुकेरबर्गचे म्हणणे त्यांनी ट्विटमध्ये मांडले आहे. अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलेली आहे. 

 "