Fri, Nov 27, 2020 10:42अमेरिकेकडून तिबेट प्रमुखांना आमंत्रण

Last Updated: Nov 22 2020 2:10AM
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

तिबेटच्या निर्वासित सरकारच्या प्रमुखांनी 6 दशकांत पहिल्यांदाच व्हाईट हाऊसचा दौरा केला आणि तिबेटविषयक प्रकरणांच्या नवनियुक्त अमेरिकन अधिकार्‍याची भेट घेतली. केंद्रीय तिबेट प्रशासनाने (सीटीए) शनिवारी ही माहिती दिली. अमेरिकेने आमंत्रण दिल्याने तिबेटच्या निर्वासित सरकारचे प्रमुख डॉ. लोबसांग सांगाय यांनी हा दौरा केल्याचेही ‘सीटीए’कडून सांगण्यात आले. या भेटीने चीनचा तिळपापड ठरलेला असून, अमेरिका चीनच्या अंतर्गत विषयांत अनावश्यक ढवळाढवळ करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. 

डॉ. लोबसांग सांगाय यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसला भेट दिली, तो क्षण तिबेटच्या द़ृष्टीने ऐतिहासिक क्षण होता, असे ‘सीटीए’ने सांगितले. तिबेटीयन निर्वासित सरकारचे प्रमुख सांगाय यांनी याबाबत ट्विटही केले. व्हाईट हाऊसमध्ये औपचारिकपणे केंद्रीय तिबेटीयन प्रशासनाचा राजकीय प्रमुख म्हणून प्रवेश करणे ही मोठ्या सन्मानाची बाब होती, असे त्यात त्यांनी म्हटले आहे. ‘सीटीए’चे मुख्य कार्यालय भारतातील धर्मशाळा या शहरात आहे.

‘सीटीए’चे वक्तव्य काय?

व्हाईट हाऊसचा दौरा ही बाब लोकशाही कार्यपद्धती आणि त्याचे राजकीय प्रमुख या दोहोंना मान्यता देणारी बाब ठरली आहे. विस्तारवादाला हा मोठा धक्का आहे. ही भेट एक आशादायक वातावरण तयार करेल आणि येत्या वर्षांमध्ये अधिकाधिक औपचारिक होत जाईल. 

आमंत्रणाचा हेतू काय?

अमेरिकन परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी 15 ऑक्टोेबर रोजी परराष्ट्र विभागातील अधिकारी डेस्ट्रो यांना तिबेट विषयासाठी विशेष समन्वयक म्हणून नियुक्त केले होते. डेस्ट्रो हे अन्य विषयांसह चीनमधील कम्युनिस्ट सरकार आणि दलाई लामा यांच्यात संवाद सुरू करणे, वाढविणे यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. 

चीनने 50 वर्षांपूर्वी तिबेटवर अनधिकृत कब्जा केला होता. तिबेटीयन बौद्ध धर्मगुरू दलाई लामा व त्यांच्या अनुयायांनी चीनविरुद्ध बंड पुकारले आणि भारतात आश्रय घेतला. अमेरिकेनेही तत्त्वत: तिबेटीयन स्वातंत्र्याला पाठिंबा दिलेला आहे. भारताने तर तिबेटीयन नागरिकांनाच आपल्या देशात सामावून घेतल्याने चीनचा भारतावर राग आहे, हे येथे उल्लेखनीय!

डेस्ट्रोंची नियुक्ती ही चालबाजी : चीन

चीनने डेस्ट्रो यांच्या तिबेटविषयक समन्वयकपदावर अमेरिकेकडून झालेल्या नियुक्तीला चालबाजी म्हटलेले आहे. तिबेटमधील स्थैर्य घालविण्यासाठीचा हा खटाटोप आहे. डेस्ट्रो-सांगाय यांच्यात यापूर्वी झालेल्या एका भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी तिबेट हा चीनचा अंतर्गत विषय आहे आणि कुणीही त्यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.