अमेरिकेचे इराणवर सायबर हल्ले 

Published On: Jun 23 2019 9:08PM | Last Updated: Jun 23 2019 8:49PM
Responsive image


वॉशिंग्टन : वृत्तसंस्था 

इराणने गुरुवारी अमेरिकेचे टेहळणी ड्रोन पाडल्याचा दावा केल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. युद्ध टळल्याची परिस्थिती असली, तरी दोन्ही देश एकमेकांविरोधात काही ना काही कारवाई करत आहेत. आता अमेरिकेनेही इराणवर सायबर हल्ले सुरू केले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी इराणवर नवीन निर्बंध लादू शकतात, अशी माहिती आहे. अमेरिका इराणच्या क्षेपणास्त्र नियंत्रण यंत्रणा आणि गुप्तहेरांच्या नेटवर्कवर बारीक नजर ठेवून असून यावर अमेरिकेकडून सायबर हल्लेही सुरू आहेत. 

ट्रम्प यांनी ट्विट केले आहे की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत इराणला आण्विक अस्त्रे विकसित करू देणार नाही. इराणजवळ आण्विक अस्त्रे असू शकत नाहीत. ओबामा यांच्या खतरनाक योजनेमुळे इराण खूप कमी वर्षांत आण्विक मार्गावर आला आहे. आम्ही सोमवारी इराणवर आणखी खूप निर्बंध लागू करणार आहोत. 

ज्या दिवशी इराणवरील निर्बंध हटतील आणि इराण पुन्हा एक समृद्ध राष्ट्र बनेल, त्या दिवसाची आम्हाला प्रतीक्षा आहे. इराणविरोधात लष्करी कारवाईबाबत ट्रम्प म्हणाले की, जोपर्यंत या समस्येचे समाधान शोधले जात नाही  तोपर्यंत या पर्यायावर विचार सुरूच राहील. दरम्यान, आमच्या विरोधात कुठल्याही प्रकराचा हल्ला करणे अमेरिकेला महागात पडेल, असा इशारा इराणच्या सैन्याने दिला आहे. ओमानच्या खाडीत 13 जून रोजी दोन तेल टँकरवर हल्ला करून ते उडवून देण्यात आले होते. अमेरिकेने याबाबत इराणवर थेट आरोप केले होते. त्यानंतर ट्रम्प यांच्या आदेशानुसार सलग एक आठवडाभर इराणवर सायबर हल्ले केले गेले. तथापि, अमेरिकेच्या सुरक्षा विभागातील अधिकार्‍यांनी अमेरिकेने सायबर हल्ला केलेला नाही, असे म्हटले आहे. 

2015 मध्ये इराणने अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी, फान्स आणि ब्रिटन यांच्यासोबत एका करारावर सह्या केल्या होत्या. त्या करारानुसार इराणने आर्थिक निर्बंध हटवल्यानंतर आण्विक कार्यक्रम स्थगित करण्यास सहमती दर्शवली होती. ट्रम्प यांनी मे 2018 मध्ये इराण आण्विक करारापासून अमेरिकेला वेगळे केले होते. तेव्हापासून दोन्ही देशांत तणाव वाढलेला आहे.

कमकुवत समजण्याची चूक करू नका

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी रविवारी इराणला अमेरिकेच्या विवेकबुद्धीला कमकुवतपणा समजण्याची चूक करू नये, असा इशारा दिला आहे. मध्यपूर्वेत इराणला कुणीही हंटिंग लायसन्स दिलेले नाही. ट्रम्प यांनी अमेरिकेचे सैन्य तयार असल्याचे सांगितले होते आणि सद्यस्थितीत सैन्याला थांबवल्याचे त्यांनी कालच स्पष्ट केले आहे, असेही बोल्टन म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू होते.