Fri, May 29, 2020 01:56होमपेज › International › इस्लामी दहशतवादाचा दोन्ही देश मिळून नायनाट करू : ट्रम्प

इस्लामी दहशतवादाचा दोन्ही देश मिळून नायनाट करू : ट्रम्प

Published On: Sep 23 2019 2:25AM | Last Updated: Sep 23 2019 2:23AM
ह्यूस्टन : वृत्तसंस्था

भारत हा अमेरिकेचा सर्वात विश्वासू मित्र आहे. भारतालाही आतापर्यंत अमेरिकेत माझ्यासारखा चांगला राष्ट्राध्यक्ष मिळाला नसेल. दोन्ही देश सुरक्षेच्या मुद्दयावर एकत्रित काम करीत आहेत. भारतासोबत मिळून आम्ही इस्लामिक दहशतवादाचा मुकाबला करू त्याचा नायनाट करु असा निर्धारही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी व्यक्त केला. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, दहशतवादाचे मूळ कुठे आहे हे सार्‍या जगाला माहीत आहे, असे उद्गार काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रम्प यांनी मोदींची मुक्तकंठाने प्रशंसा केली. मोदीं यांच्या नेतृत्वात भारत मजबूत होत आहे, समृद्ध होत आहे. त्यांच्या सरकारने भारतातील 30 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेतून बाहेर काढण्याची महत्त्वपूर्ण आणि प्रशंसनीय कामगिरी केली आहे. आज संपूर्ण जग  एक समर्थ देश म्हणून भारताकडे पहात आहे. अमेरिका आणि भारत या दोन्ही बलाढ्य राष्ट्रांच्या संविधानाची सुरुवात वुई द पीपल्सने सुरूवात होते.  दोन्ही देशांतील  हा समान धागा असल्याचं ट्रम्प म्हणाले. मोदींच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे  भाग्य लाभल्याबद्दल मी स्वतःला नशिबवान समजतो. आभारी आहे. मोदींसोबत मला या मंचावर उपस्थित राहण्याची संधी मिळाली. येथील अनिवासी भारतीयाचा मला अभिमान वाटतो. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या नव्या संरक्षण करारावर लवकरच निर्णय होईल. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताने मोदी यांच्या नेतृतावावर विश्वास दाखवून त्यांना पुन्हा निवडून दिले आहे त्यामुळे मी त्यांचे मनापासून अभिनंजन करतो. असे ट्रम्प यांनी सांगितले. मोदी यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्यानिमित्त ट्रम्प यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या.

अमेरिकेतील ‘नाईन इलेव्हन’ असो वा भारताच्या मुंबईतील 26-11... हजारोे निष्पाप लोकांची हत्याकांडे घडवणार्‍या या दहशतवादाची मुळे कुठे आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. ‘वेलफेअर’साठी (कल्याण) काही गोष्टींना ‘फेअरवेल’ (निरोप) द्यावा लागतो. दहशतवादालाही निरोप द्यायचा तर त्याला आश्रय देणार्‍या शक्तींना ठेचून काढावेच लागेल, असा खणखणीत इशारा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामोल्लेख न करता पाकिस्तानला दिला.

दहशतवादाचे कारण असलेल्या कलम 370 ला निरोप

ट्रंप हे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत आहेत, असे सांगून मोदी पुढे म्हणाले, की मानवकल्याणाची गाथा लिहायची तर अकल्याणाची कारणे संपवावी लागतात. फेअरवेल (निरोप) आणि फेअरवेल (कल्याण) अशी अदलाबदली करावी लागते. गेल्या 5 वर्षांत भारताने उघड्यावरील शौचाला निरोप दिला आहे. या काळात 99 टक्के सॅनिटेशन केले. 11 कोटी शौचालये बांधली. लालफितशाहीला निरोप दिला. आता 24 तासांत नव्या कंपनीची नोंदणी होते. करांच्या जाळ्याला निरोप दिला. जीएसटी आणला. अशाच प्रकारे दहशतवादाची ताकद ठरलेल्या कलम 370 लाही आम्ही निरोप दिला आणि जम्मू-काश्मीर व लडाखच्या लोकांना भारतीय विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले.

मोदीजी मुंबईला येऊ का?

पुढच्या वर्षी मुंबईत बास्केट बॉल स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी हजारो लोक मुंबईत येणार आहेत. मोदीजी मलाही हा खेळ पाहण्याची खूप इच्छा आहे. मी हा खेळ पाहण्यासाठी मुंबईत येऊ का? तुम्ही बोलावलं तर मी नक्कीच येऊ शकतो  असे ते म्हणाले. त्यांच्या या इच्छेला सहमती दर्शवित मोदींनी त्यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले.