पाकिस्तानला उपरती; जम्मू-काश्मीर भारताचेच राज्य (Video) 

Published On: Sep 10 2019 5:40PM | Last Updated: Sep 10 2019 6:21PM
Responsive image


जिनीव्हा : पुढारी ऑनलाईन 

संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात आज (दि.१०) मानवाधिकार समितीच्या बैठकीचे सत्र सुरू झाले आहे. या सत्रात जम्मू-काश्मीरमधील सद्य परिस्थितीवर मानवाधिकाराच्या अनुषंगाने भारत आणि पाकिस्तान आपले म्हणणे मांडणार आहेत. हे सत्र सुरू होण्याआधी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद खुरेशी यांनी आंतरराष्ट्रीय पत्रकारांशी संवाद साधला. पण, त्यांनी यावेळी 'भारताचे राज्य जम्मू-काश्मीर' असा उल्लेख केला. पाकिस्तानने कायमच जम्मू-काश्मीरवर दावा सांगितला आहे. या दाव्याला पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनीच हरताळ फासला आहे. 

भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानने काश्मिरात मानवाधिकारांची गळचेपी होत असल्याचा आरोप केला होता. जम्मू-काश्मीर विषयी संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीसमोर चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. पण, त्यापूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत 'भारताचे राज्य जम्मू-काश्मीर' असा उल्लेख करून ते पुरते फसले आहेत. 

पाकिस्तान १९४७ पासूनच जम्मू काश्मीरवर दावा सांगत आला आहे. यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत तीन युद्धे झाली आहेत. याच प्रश्नावरून दोन्ही देशात तणाव कायम आहे. आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रीच 'भारताचे राज्य जम्मू काश्मीर' म्हणाल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.