Wed, Dec 02, 2020 08:55होमपेज › International › अन् गाढवाची भेट घेतल्यानंतर मालकाचे डोळे पाणावले

अन् गाढवाची भेट घेतल्यानंतर मालकाचे डोळे पाणावले

Last Updated: May 23 2020 12:01PM
माद्रिद : पुढारी ऑनलाईन 

कोरोना विषाणूमुळे एक गंभीर सामाजिक संकट निर्माण झाले आहे. हा विषाणू टाळण्यासाठी लोकांना सोशल डिस्टन्सिंगचा जड अंतःकरणाने अवलंब करावा लागत आहे. यामुळे लोकांना आपल्या प्रियजनांपासून लांब राहावे लागत आहे. स्पेनमध्ये जेव्हा लॉकडाऊन हटविण्यात आला तेव्हा तेथील लोकांनी त्यांच्या प्रियजनांना भेटण्यासाठी धाव घेतली. आपले प्रियजन भेटल्यानंतर प्रत्येक जण भावनिक होताना दिसले. काही जणांना तर आपल्या आवडत्या पाळीव प्राण्यांची भेट घेतल्यानंतर अश्रू अनावर झाले.

स्पेनमध्ये कित्येक दिवसांच्या लॉकडाऊननंतर इस्माईल फर्नांडिस या व्यक्तीला त्याच्या पाळीव गाढवाला भेटता आले. या गळाभेटी दरम्यान दोघांचेही डोळे पाणावले होते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे इस्माईल व त्याचे गाढव हे दोघे जवळजवळ दोन महिने भेटू शकले नव्हते. 

स्पेन सरकारने लॉकडाऊन हटवताच इस्माईलने पहिल्यांदा त्याचे फार्म हाऊसवर गाठले. त्याला भावाची आणि बाल्डो नावाच्या गाढवाची भेट घ्यायची होती. फार्म हाऊसवर पोहोचताच इस्माईलने बाल्डो अशी हाक मारली. ही हाक ऐकून गाढव मोठमोठ्याने ओरडू लागले. मालकाचा आवाज ऐकून ते सैरभैर झाले. जेव्हा इस्माईलने गाढवाची गळभेट घेतली तेव्हा दोघांचेही डोळे पाणावलेले होते.