Fri, Apr 23, 2021 13:34
कोरोनाचा उद्रेक : भारतीयांना न्यूझीलंडमध्ये नो एंट्री; स्वतःच्या नागरिकांनाही प्रवेशबंदी

Last Updated: Apr 08 2021 2:15PM

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न
वेलिंग्टन (न्यूझीलंड) : पुढारी ऑनलाईन

भारतात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडने महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारतातून येणाऱ्या नागरिकांना न्यूझीलंडने बंदी घातली आहे. विशेष म्हणजे स्वतःच्या नागरिकांनाही न्यूझीलंडने प्रवेशबंदी केली आहे. न्यूझीलंडमध्ये नवीन २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यात १७ भारतीयांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडने भारतीयांना प्रवेशबंदी केली आहे.

वाचा : चिंताजनक : सलग दुसर्‍या दिवशी एक लाखांहून अधिक रुग्‍णांची नोंद

''आम्ही भारतातून येणाऱ्या नागरिकांना न्यूझीलंडमध्ये प्रवेश नाकारत आहोत. ही तात्पुरत्या स्वरुपाची बंदी असेल,'' असे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी ऑकलंड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.

भारतातून येणाऱ्या नागरिकांना ११ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान प्रवेशबंदी राहील, असे न्यूझीलंडकडून स्पष्ट करण्यात आले आहे. न्यूझीलंडमध्ये स्थानिक पातळीवर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तेथे काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  

वाचा : पंतप्रधान मोदी यांनी घेतला लसीचा दुसरा डोस

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशात गेल्या २४ तासांत १ लाख २६ हजार ७८९ रुग्ण आढळून आले आहेत. तर ६८५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतात सक्रिय रुग्णांची संख्या ९ लाख १० हजार ३१९ एवढी आहे. तर आतापर्यंत १ लाख ६६ हजार ८६२ जणांचा मृत्यू झाला आहे.  

वाचा :  लसीबाबत संभ्रम पसरवणे मूर्खपणाचे; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य सरकारला झापले