Tue, Aug 04, 2020 22:36होमपेज › International › कोरोना विषाणूची मायक्रोस्कोपीक छायाचित्रे प्रसिद्ध

कोरोना विषाणूची मायक्रोस्कोपीक छायाचित्रे प्रसिद्ध

Last Updated: Feb 18 2020 1:57AM

कोरोना विषाणूची मायक्रोस्कोपीक छायाचित्रे 

 

वॉशिंग्टन (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन

चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे हाहाकार सुरुच आहे. आतापर्यंत या विषाणूचा संसर्ग होऊन १,५२३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ६६,४९२ वर पोहोचली आहे. आता कोरोनाची (कोविड-१९) स्कॅनिंग आणि ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीक छायाचित्रे अमेरिकेच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीजीस'ने (एनआयएआयडी) प्रसिद्ध केली आहेत.

वाचा : जागतिक आरोग्य संघटनेनं 'कोरोना'ला दिलं 'हे' नवीन नाव

कोरोना विषाणूची ही छायाचित्रे २०१२ मध्ये मध्य पूर्वेतील देशांमधून आढळून आलेल्या 'मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम-कोरोना व्हायरस' (मर्स) पेक्षा फारशी वेगळी नसल्याचे 'एनआयएआयडी'ने म्हटले आहे.
कोरोना विषाणू हा जगासाठी मोठा धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग २५ देशांमध्ये पसरला आहे. हा विषाणू नेमका कसा निर्माण झाला याचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. ऑस्ट्रेलिया, चीन, फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेसह अनेक देश कोरोना विषाणूवर लस शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप त्याला यश आलेले नाही. 

वाचा : कोरोना प्रादुर्भावाला अमेरिका जबाबदार

हा आजार कसा पसरतो?

हा संसर्गजन्य आजार आहे. हे विषाणू एकाकडून दुसर्‍याकडे संक्रमित होऊनच आपले अस्तित्व टिकवतात. प्राण्याकडून मनुष्याकडे संक्रमित होणे हाही एक अस्तित्व टिकवण्याचा प्रकार आहे. प्रथम हा विषाणू भक्ष्याची रोगप्रतिकारक शक्‍ती कमी करतो आणि आपली संरचना बदलतो. याप्रकारे हा आजार वेगाने प्रसारित होतो.

या आजाराची लक्षणे कोणती? 

सर्वसामान्य लक्षणे ही ताप, सर्दी खोकला, श्‍वसनाला त्रास होणे व न्यूमोनिया ही असतात. काही रुग्णांमध्ये श्‍वसनाच्या त्रासाव्यतिरिक्‍त उलटी, मळमळ व डायरिया ही लक्षणे असू शकतात.