Tue, Mar 09, 2021 15:05
अपघातानंतरचा धोका टाळण्यासाठी दुचाकीस्वारांसाठी जिन्स-जॅकेट कम एअरबॅग!

Last Updated: Jan 25 2021 2:51AM
पॅरिस/नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कार चालविण्यापेक्षाही सुरक्षेच्या उपायांशिवाय मोटारसायकल चालविणे अधिक धोक्याचे आहे. हेल्मेट हा एक उपाय असला तरी तो केवळ डोक्याची सुरक्षा करतो. अशात फ्रान्समध्ये दुचाकीस्वारांना वरदान ठरणारे जिन्स-जॅकेट कम एअरबॅग साकारते आहे. दुचाकीस्वाराने घातलेले जिन्स-जॅकेट अपघातावेळी आपोआप एअरबॅगचे रूप धारण करेल आणि दुचाकीस्वाराला इजा होण्यापासून वाचविता येईल.

भारतात दरवर्षी जेवढे म्हणून अपघात होतात, त्यातील एकूण मृतांच्या संख्येत दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण 37 टक्के आहे. ही बाब बघितली की, फ्रान्सच्या या संशोधनाचे महत्त्व अधोरेखित होते. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत माहितीनुसार सन 2019 मध्ये भारतात दर एका तासाला 6 दुचाकीस्वारांना मृत्यू ओढविलेला आहे. अशात फ्रान्समधील अभियंता मोजेस शाहरिवार यांची एअरबॅग जिन्स दुचाकीस्वारांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. मोजेस यांची जिन्स आणि ‘ऑटोनॉमस’चे जॅकेट हे कॉम्बिनेशन पुढच्या वर्षी बाजारात आलेले असेल.

एअरबॅगचा दुबार वापर शक्य

- एअरबॅग बनविण्याची पद्धतच अशी आहे की, ती पुन्हा वापरली जाऊ शकते.
- पुनर्वापरासाठी फक्त एअरबॅगमध्ये गॅस नव्याने भरावा लागेल.
- सध्या या उत्पादनाची चाचणी सुरू आहे. 2022 पर्यंत ते बाजारात येईल.

दुचाकीस्वार सीटवेगळा होणार; जिन्स-जॅकेट हवेने फुगणार

अपघाताच्या, पडण्याच्या, कोसळण्याच्या स्थितीत चालक सीटवेगळा होताच त्याच्या जिन्स-जॅकेटमधील एअरबॅग कॉम्प्रेस्ड एअरने फुलतील व आदळल्याने शरीराला बसणारा झटका किंचितसा असेल. फ्रान्समधीलच एका कंपनीने (ऑटोनॉमस इलेक्ट्रॉनिक्स) अ‍ॅटोमॅटिक हायटेक सेन्सर असलेले जॅकेट विकसित केले आहे, जे पडण्या-आदळण्याच्या क्षणात आपोआप सक्रिय होईल आणि एअरबॅग खुली झालेली असेल.