Wed, Jan 20, 2021 21:56रशियन लसीचे १० कोटी डोस भारतात तयार होणार

Last Updated: Nov 28 2020 1:12PM
आतापर्यंतची जगातील सर्वाधिक स्वस्त लस

‘स्पुत्निक व्ही’ रशियात विनामूल्य, भारतासह अन्य देशांत ७०० रुपयांहून कमी

मॉस्को : वृत्तसंस्था

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि भारतातील औषध कंपनी हेटरो यांनी कोरोनावरील ‘स्पुत्निक व्ही’ ही लस तयार करण्यासाठी करार केला आहे. करारानुसार दरवर्षी १० कोटी डोसचे उत्पादन भारतात करण्यात येणार आहे. आगामी वर्षात उत्पादनाला सुरुवात होईल. ही जगातील सर्वात स्वस्त लस असेल.

लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीला मंजुरीही मिळालेली आहे. बेलारूस, संयुक्त अरब अमिरात, व्हेनेझुएलासह अनेक देशांत चाचण्या सुरू आहेत. भारतातही दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

या लसीचे १२० कोटी डोस बनविण्यासाठी ५० हून अधिक देशांकडून विनंती करण्यात आली आहे. जागतिक बाजारात पुरेसा पुरवठा करता यावा म्हणून भारतासह चीन, ब्राझील, दक्षिण कोरिया आणि अन्य देशांतून या लसीचे उत्पादन करण्यात येणार आहे. हेटरो ही हैदराबादेतील कंपनी असून, १२६ देशांत या कंपनीचे जाळे पसरलेले आहे.

‘स्पुत्निक व्ही’ची ठळक वैशिष्ट्ये

 ‘स्पुत्निक व्ही’ चाचणीदरम्यान कोरोनाशी लढण्यात ९५ टक्के परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. आतापर्यंतची ही सर्वात स्वस्त लस आहे.

 पहिला डोस दिल्यानंतर ४२ दिवसांनी या लसीने ९५ टक्के परिणामकारकता दाखविली. पहिल्या २४ दिवसांत परिणामकारकता ९१ टक्के होती.