Tue, Oct 20, 2020 11:54होमपेज › International › कुपोषण निर्देशांकात भारत गंभीर श्रेणीत

कुपोषण निर्देशांकात भारत गंभीर श्रेणीत

Last Updated: Oct 18 2020 12:58AM
बर्लिन : वृत्तसंस्था

जागतिक कुपोषण निर्देशांक 2020 अहवाल प्रसिद्ध झाला असून, या अहवालांतर्गत 107 देशांच्या यादीमध्ये भारत 94 व्या क्रमांकावर आहे. गतवर्षी 117 देशांच्या या यादीत भारत 102 व्या क्रमांकावर होता. 

‘कन्सर्न वर्ल्डवाईड’ या आयरिश संस्थेसह ‘वेल्ट हंगर हिल्फी’ या जर्मन संस्थेने संयुक्तपणे हा अहवाल तयार केला आहे. अहवालात भारताची परिस्थिती कुपोषणात गंभीर असल्याचे म्हटले आहे. याआधीच्या 2018 मधील अहवालात 119 देशांच्या यादीत भारत 103 क्रमांकावर होता. जगभरातील स्थिती मध्यम असल्याचा उल्लेख जागतिक कुपोषण निर्देशांकात करण्यात आला असून जगभरातील 60 कोटींहून अधिक लोक कुपोषित असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

विचारात घेतले जाणारे घटक

पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन - मुलांची वाढ खुंटणे - कुपोषण - बालमृत्यू दर - पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यूदर.

भारताची स्थिती अलीकडे सुधारली

 देशातील भुकेच्या स्थितीवरून देशांना 0 ते 100 असे गुण दिले जातात. त्यानुसार त्यांची क्रमवारी ठरवली जाते. यामध्ये 0 गुण हे सर्वोत्तम समजले जातात.
 शून्य गुण असल्यास त्या देशात भुकेची स्थिती काळजी करण्यासारखी नाही असाच होतो. भारताला 50 पैकी 27.2 गुण देण्यात आले असून, परिस्थिती गंभीर आहे.
 9.9 पेक्षा कमी गुण असल्यास परिस्थिती गंभीर नाही. 10 ते 19.9 मध्ये गुण असल्यास परिस्थिती मध्यम आहे. 20 ते 34.9 गुण असल्यास भुकेची परिस्थिती गंभीर आहे.
 2020 मधील भारताची कामगिरी तुलनेत सुधारली आहे. भारताला 27.2 गुण असून 2000 मध्ये 38.9, 2006 मध्ये 37.5, 2012 मध्ये 29.3 गुण होते.

 "