बैरूतमध्ये आंदोलकांची मंत्रालयात घुसून तोडफोड

Last Updated: Aug 10 2020 1:15AM
Responsive image


बैरूत : वृत्तसंस्था 

लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये झालेल्या स्फोटात मरणार्‍यांची संख्या रविवारी 163 वर पोहोचली. सरकारच्या अपयशाविरोधात येथे हिंसाचार वाढला असून चिडलेल्या आंदोलकांनी परराष्ट्र, अर्थ आणि पर्यावरणमंत्रालयाच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. आग लावण्याचाही प्रयत्न केला. 

पंतप्रधान हसन दियाब यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले होते. पंतप्रधान हसन दियाब म्हणाले होते, की लोकांची नाराजी आम्ही समजू शकतो. स्फोटासाठी जबाबदार लोकांना सोडणार नाही. आम्हाला दोन महिन्यांचा वेळ द्या. इतर पक्षांशी बोलून निवडणूक सुधारणांसाठी पावले उचलली जातील. त्यानंतर नागरिकांना त्यांच्या आवडीचे सरकार निवडता येईल. पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही लोकांनी संसदेची इमारत तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत 200 जण जखमी झाले आहेत. आंदोलकांची संख्या तीन हजारांच्या आसपास होती. पोलिस बळ कमी होते. जखमीत बहुतांश पोलिस कर्मचारी आहेत. बैरूतमधील आंदोलन हिंसक होत चालले आहे. सरकारी इमारतींना आग लावल्यावर आंदोलकांनी तेथे सेल्फी घेतले. 

गेल्या मंगळवारी बैरूत येथील बंदरात सात वर्षांपासून असलेल्या अमोनियम नायट्रेटच्या कंटेनरचा मोठा स्फोट झाला होता. या स्फोटाचा आवाज 240 किलोमीटर दूर ऐकू गेला होता. दरम्यान, या स्फोटात चार हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. त्यातील काहींची स्थिती गंभीर आहे.