पाकमध्ये हिंदू डॉक्टर युवतीची हत्या!

Last Updated: Nov 12 2019 1:28AM
Responsive image


कराची : वृत्तसंस्था

पाकिस्तानातील हिंदू समाजातील मेडिकलची विद्यार्थिनी नम्रता चंदानी हिने आत्महत्या केलेली नसून, तिच्यावर आधी बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिचा खून करण्यात आला, असा निष्कर्ष तिच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीच्या अंतिम अहवालानुसार काढण्यात आला आहे. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचे आहे, असे भासविण्याचा प्रयत्न महाविद्यालय प्रशासनाचा होता. नम्रताचा भाऊ स्वत: डॉक्टर आहे. दोरीने गळा आवळलेल्या अवस्थेतील बहिणीचा मृतदेह पाहताच ही हत्या असल्याचे त्याने धाय मोकलून सांगितले होते.

16 सप्टेंबर रोजी सकाळी नम्रताचा मृतदेह लेडीज होस्टेलच्या खोलीतून ताब्यात घेण्यात आला होता. गळ्याला दोर आवळलेला होता. नम्रताचे बंधू विशाल हे स्वत: कराचीतील प्रसिद्ध सर्जन आहेत. त्यांनी मृतदेह पाहताच ही बाब हत्या असल्याचे ओळखले होते. नम्रता विद्यार्थिनी असलेले बिबी आसिफा मेडिकल कॉलेज व्यवस्थापन मात्र ही आत्महत्या असल्याचेच सांगत होते. चांदका मेडिकल कॉलेजने नम्रताच्या उत्तरीय तपासणीचा (ऑटोप्सी रिपोर्ट) अंतिम अहवाल बुधवारी जारी केला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. परिणामी गुरुवारी अल्पसंख्याक हिंदू समुदाय कराचीत रस्त्यावर उतरला. याआधी 30 ऑक्टोबरला नम्रताचा डीएनए अहवाल समोर आला होता. पोलिसांनी तेव्हा डीएनए रिपोर्टच्या हवाल्याने स्पष्ट केले होते की, नम्रताच्या शरीरावर तसेच कपड्यांवर पुरुषाचे डीएनए अंश मिळालेले आहेत.