Fri, Dec 04, 2020 05:19होमपेज › International › दोन औषधांच्या संयुक्‍त वापराने एड्स रुग्ण बरा! 

दोन औषधांच्या संयुक्‍त वापराने एड्स रुग्ण बरा! 

Last Updated: Jul 11 2020 1:22AM
साओपाऊलो : वृत्तसंस्था

ब्राझीलमधील एक व्यक्‍ती एड्समुक्‍त झाला आहे. एचआयव्ही विषाणू त्याच्या शरीरातून कायमचा नष्ट झाला आहे, असा दावा साओपाऊलोतील फेडरल युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केला आहे. एड्स रुग्णाला अनेक प्रकारच्या अँटिव्हायरल व निकोटिनामाईड औषधांचे ‘कॉम्बिनेशन’ देण्यात आले होते. संशोधकांनी रुग्णाचे नाव गोपनीय ठेवले आहे. 

दर दोन महिन्यांनी औषध दिले

संशोधकांनी नुकत्याच ऑनलाईन झालेल्या एड्स 2020 परिषदेत हा दावा केला. डॉ. रिकार्डो डियाज यांनी सांगितले, ऑक्टोबर 2012 मध्ये रुग्णाचे एचआयव्ही निदान झाले होते. ट्रायलदरम्यान रुग्णाने एड्सच्या इलाजासाठीची औषधे घेणे बंद केले. संशोधनादरम्यान रुग्णाला दीर्घकाळपर्यंत दर दोन महिन्यांनी अँंटिरेट्रोव्हायरल औषधे आणि निकोटिनामाईड औषधे संयुक्‍तपणे देण्यात आली. 

वर्षभरानंतर रुग्णाचे रक्‍त तपासले असता त्याचा अहवाल एचआयव्ही निगेटिव्ह आला आहे. रुग्णाच्या शरीरातून विषाणूंचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी अँटीबॉडीची पातळी काय होती, हे मात्र समजू शकले नाही. 

रुग्णाचे म्हणणे आहे, मला दुसरे जीवन मिळाले आहे. या प्रकरणावर तसेच संशोधनाला अधिकृत दुजोरा प्राप्‍त झाल्यास स्टेम सेल प्रत्यारोपणाशिवाय एचआयव्ही विषाणू रुग्णातून नष्ट झाल्याचे हे पहिलेच प्रकरण ठरणार आहे.

मनुष्य एकदा एचआयव्ही संक्रमित झाला, की एचआयव्ही व्हायरस शरीरातून काढणे वा मारणे अशक्य असते. कारण हा विषाणू रक्‍ताच्या पेशींमध्ये स्वत:साठी एकप्रकारे घरच बनवून घेतो. कुठल्याही औषधाने ते आपली जागा सोडत नाहीत. औषधांनी फक्‍त तो कृतीशील बनत नाही.