Tue, Aug 04, 2020 14:28होमपेज › International › चीनकडून पाकिस्तानला घातक ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचा पुरवठा

चीनकडून पाकिस्तानला घातक ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचा पुरवठा

Last Updated: Jul 07 2020 1:36AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

हल्ला करण्याची क्षमता असलेले चार घातक ड्रोन चीनकडून पाकिस्तानला मिळणार आहेत. याबरोबरच त्यांना काही क्षेपणास्त्रांचा पुरवठाही केला जाणार असल्याचे कळते. या ड्रोनचा वापर करून ही क्षेपणास्त्रे डागता येणे शक्य असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. 

पाकिस्तानात होत असलेल्या इकॉनॉमिक कॉरिडोर आणि नौदल तळाच्या निर्मितीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे चीनने स्पष्ट केले आहे. बलुचिस्तानला ग्वादर नावाचे बंदर आहे. याच ठिकाणी चीन पाकिस्तानच्या मदतीने नौदल तळ उभारत आहे. चीन पाकिस्तानला देत असलेल्या मदतीमध्ये एक लाँच ग्राऊंड स्टेशन आणि ड्रोनचा समावेश आहे. चीन आणि पाकिस्तान एकत्रित मिळून हल्ला करू शकतील अशा 48 ड्रोन्सवर सध्या काम सुरू आहे. पाकिस्तान आपल्या हवाई दलासाठी त्याचा वापर करणार आहे. जीजे-2 असे ड्रोन्सचे नाव आहे. 

चीनच्या जीजे-2 या ड्रोनमध्ये एकाचवेळी बारा क्षेपणास्त्रे लावता येऊ शकतात. हवेतून जमिनीवर मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांचा त्यात वापर करता येतो. लिबियामध्ये मोठ्या प्रमाणावर या ड्रोन्सचा वापर केला जात आहे. भारत आणि चीन यांच्यातील सध्याचा वाढता तणाव लक्षात घेता चीनने पाकिस्तानला ड्रोन देणे भारताच्या द़ृष्टीने चिंतेची बाब असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.