भारत-चीन सीमेवर शांतता राखण्यावर दोन्ही देश सहमत

Last Updated: Jul 12 2020 1:33AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


नवी दिल्ली : पीटीआय

भारत आणि चीन यांच्यात शुक्रवारी पुन्हा एकदा पूर्व लडाखमधील सीमावादावर राजनैतिक चर्चा झाली आणि प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) पूर्ण शांतता प्रस्थापित करण्यासाठी या भागातील सैन्य पूर्णपणे मागे घेण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली.

परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी माहिती देताना सांगितले की, भारत-चीन सीमा प्रकरणी सल्लामसलत आणि समन्वयासाठी काम करण्यावर ही चर्चा झाली. दोन्ही देशांनी द्विपक्षीय करार आणि शिष्टाचारानुसार सीमा भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी एलएसीवर असलेले सैन्य पूर्णपणे मागे घेण्यावर सहमती दर्शविली. द्विपक्षीय संबंधाच्या सर्वांगीण विकासासाठी सीमाभागात कायमस्वरूपी शांतता राखणे आवश्यक असल्याचेही दोन्ही देशांनी मान्य केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

भारत आणि चीन यांच्या दरम्यान झालेल्या ऑनलाईन चर्चेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयातील पूर्व  आशिया विभागाच्या संयुक्‍त सचिवांनी केले. तर चीनचे नेतृत्व चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील सीमा आणि सागरी विभागाच्या महासंचालकांनी केले.

पश्‍चिम सेक्टरमधील एलएसीजवळील भागातून सध्या सुरू असलेल्या सैन्य माघारीनंतर भारत-चीन सीमा भागातील परिस्थितीचाही चर्चेदरम्यान आढावा घेण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. वरिष्ठ कमांडरस्तरीय झालेल्या समझोत्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्यावरही दोन्ही देशांची सहमती झाली. मागील आठ आठवड्यांपासून पूर्व लडाखमधील अनेक ठिकाणी भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर ठाकल्यामुळे दोन्ही देशांदरम्यान प्रचंड तणाव निर्माण झाला होता. गलवान खोर्‍यातील धुमश्‍चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर हा तणाव अनेक पटींनी वाढला होता. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून दोन्ही देशांचे सैन्य संघर्षाच्या तीन ठिकाणांवरून माघारी परतत आहे.

राजनाथ सिंह यांनी घेतला आढावा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पूर्व लडाखमधील तणावग्रस्त भागातून चिनी सैनिक माघारी परतत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍याबरोबर शुक्रवारी परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला. सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली. संरक्षणमंत्र्यांनी प्रमुख सेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत, लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंह आणि हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदौरिया तसेच अन्य वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांच्या  साथीत परिस्थितीचा आढावा घेतला. 

सूत्रांनी सांगितले की, जनरल नरवणे यांनी, गलवान खोरे, गोगरा, हॉट स्प्रिंग्ज आणि पैगोंग त्सोच्या पॉईंट 4 या भागांतून सैन्य मागे घेण्यासाठी झालेल्या परस्पर सहमतीच्या पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.