चिंताजनक! न्यूझीलंडमध्ये तब्बल १०२ दिवसांनंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव

Last Updated: Aug 14 2020 1:15AM
Responsive image


ऑकलॅँड : पुढारी ऑनलाईन

कोरोना विषाणूचा जगभरात हाहाकार सुरु आहे. अद्याप कोणत्याच देशाला कोरोनावर मात करता आलेली नाही. मात्र, या सर्वांला अपवाद ठरलेला न्यूझीलंड हा कोरोनामुक्त देश म्हणून पहिला ठरला होता. येथे गेले १०० दिवस एकही रूग्ण सापडला नव्हता. मात्र न्यूझीलंडचा कोरोनामुक्त देश होण्याचा आनंद फार काळ टिकला नाही. येथे पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. ऑकलॅँडमध्ये चार नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. 

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनीच याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना ऑकलॅँडच्या एका घरातील चार सदस्य कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यांना कोरोना कसा झाला याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. देशात १०२ दिवसांनंतर स्थानिक प्रादुर्भाव झाला आहे. 

न्यूझीलंडमधील सर्वात मोठे शहर ऑकलॅँड बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील अलर्टवर ठेवण्यात येणार आहे. तीन दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे. अशी माहिती सांगत त्या कुटुंबाला कोरोना एवढ्या कालावधीनंतर कसा झाला याचा शोध घेणार आहोत, असे पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न म्हणाल्या. 

तसेच, एवढ्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडतील याची अपेक्षा नव्हती. मात्र, त्यासाठी आम्ही तयारी केली होती. ऑकलॅँडमध्ये प्रवासावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. जे लोक तिथे राहतात आणि घरी जात आहेत त्यांना अडविले जाणार नाही. शुक्रवारपासून लॉकडाऊन वाढविले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान अर्डर्न यांनी यावेळी केली.