Wed, Feb 19, 2020 00:14होमपेज › Goa › मंत्री पाऊसकर धमकी प्रकरणी सहाव्या संशयिताला अटक

मंत्री पाऊसकर धमकी प्रकरणी सहाव्या संशयिताला अटक

Last Updated: Feb 15 2020 12:52AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांना खंडणीसाठी फोनवरून धमकी दिल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सहावा संशयित आल्फी ऊर्फ अँथोनी सावियो लोबो याला शुक्रवारी अटक केली. त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यासमोर उभे केले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

मंत्र्यांना धमकी देण्याची ही घटना गेल्या महिन्यात झाली होती. मंत्री पाऊसकर यांनी तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुजरातला जाऊन 4 संशयितांना अटक केली होती. सध्या ते चौघेही संशयित जामिनावर मुक्त आहेत. या खंडणी प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांनी गुरूवारी ब्रिजेश गडियाली या गुजरातच्या अन्य एका संशयिताला अटक केली होती. त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आहे. पोलिसांनी शुक्रवारी अटक केलेला आल्फी ऊर्फ अँथोनी सावियो लोबो हा संशयित स्थानिक असून त्यानेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांना खंडणीसाठी धमकीचे षडयंत्र रचले होते. खंडणीचा कट रचून त्याने अन्य संशयितांच्या सहाय्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांना खंडणीसाठी फोन करून धमकी दिली होती, अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली होती. पोलिस कोठडीत त्याची जबानी नोंदवून घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.