होमपेज › Goa › शॅक्स व्यवसायाची सुरुवात धिमी क्रुझ कार्दोज यांची माहिती

शॅक्स व्यवसायाची सुरुवात धिमी क्रुझ कार्दोज यांची माहिती

Last Updated: Dec 05 2019 1:33AM
पणजी : प्रतिनिधी 

राज्यातील किनार्‍यांवर अखेर शॅक्स उभे राहिले असले तरी यंदा या व्यवसायाची सुरुवात बरीच धिमी झाल्याचे गोवा शॅक्स मालक कल्याण सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी सांगितले. पर्यटकांची संख्या घटल्याने तसेच शॅक्स उभारण्यास विलंब झाल्याने त्याचा व्यवसायाला फटका बसला आहे. यंदाचा पर्यटन हंगाम सुरु झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी शॅक्स उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्याचा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) केंद्राला सादर करण्यात न आल्याने राज्याच्या शॅक्स धोरणाला राष्ट्रीय हरीत लवादाने स्थगिती दिली होती. त्यानंतर या स्थगितीला मुंबई उच्च न्यायालयात शॅक्समालकांनी आव्हान दिल्यानंतर ती उठवण्यात आली. शॅक्स वितरणाची प्रक्रिया करुन शॅक्स उभारण्यात आले. साधारणतः ऑक्टोबर महिन्यात अर्थात पर्यटन हंगाम सुरु होताच हे शॅक्स उभारले जातात. मात्र, यंदा शॅक्स नोव्हेंबर महिन्याच्या मध्यास उभारण्यात आले, असे सांगून कार्दोज म्हणाले, यंदा पर्यटन हंगाम सुरु झाल्याच्या दीड महिन्यानंतर शॅक्स उभारण्यात आले. त्याचा व्यवसायाला बराच फटका बसला आहे. राज्यातील विविध किनार्‍यांवर एकूण 367 शॅक्स उभारण्यात आले. शॅक्स उभारण्याला विलंब झाल्याने आर्थिकदृष्ट्या जवळपास 30 ते 40 टक्के फटका बसला आहे. किनार्‍यांवरील शॅक्सकडे देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने आकर्षित होतात, मात्र, यंदा शॅक्स उभारुन जवळपास 15 दिवस उलटून गेले असले तरी पर्यटकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यातील पर्यटकांची संख्या अपेक्षेनुसार नाही. विविध कारणांमुळे पर्यटकांच्या संख्येत घट नोंद होत आहे. त्यामुळे यंदा शॅक्स व्यवसायाची धिम्या गतीने सुरू आहे. डिसेंबर महिन्याअखेर नाताळ तसेच नववर्ष असल्याने त्यानिमित्त तरी मोठ्या संख्येने येणारे देशी-विदेशी पर्यटक शॅक्सना भेटतील व शॅक्स व्यवसाय बहरेल अशी अपेक्षा आहे, असेही कार्दोज यांनी सांगितले.