Wed, Aug 12, 2020 21:47होमपेज › Goa › सात हजार जणांची उत्तरप्रदेशला रवानगी

सात हजार जणांची उत्तरप्रदेशला रवानगी

Last Updated: May 22 2020 11:54PM
मडगाव पुढारी वृत्तसेवा

मडगावच्या कोंकण रेल्वे स्थानकावरून 7196 प्रवाशांना घेऊन पाच श्रमिक एक्स्प्रेस टेन्स शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या पाच जिल्ह्यांसाठी रवाना झाल्या आहेत. लॉकडाऊन झाल्यापासून  उत्तर प्रदेशातील हजारो लोक गोव्यात अडकुन पडले होते.शुक्रवारी सर्वांचे कागदोपत्री सोपस्कर पूर्ण करून सर्वाना उत्तर प्रदेशला रवाना करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कामगार वर्गातील लोकांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वात प्रथम देवोरिया जिल्ह्यासाठी ट्रेन सोडण्यात आली. या गाडीत 1628 प्रवाशांना जागा देण्यांत आली, दुपारी एक वाजता प्रतापगडसाठी सोडण्यात आलेल्या गाडीत  1628 तर सायंकाळी चार वाजता माऊ जिल्ह्यासाठी सोडण्यात आलेल्या गाडीतून 1628 प्रवाशांना पाठवण्यात आले.सायंकाळी सात च्या सुमारास सहारनपुर साठी गाडी सोडण्यात आली त्यात 1512 जणांना पाठवण्यात आले तर सर्वात शेवटी मिर्जापूर साठी निघालेल्या गाडीत सुमारे 800 जणांना पाठवण्यात आले .सदर गाडी करमळी स्थानकावर थांबा घेणार असून तिथे आणखी 800 जणांना घेतले जाणार आहेत अशी माहिती देण्यात आली.

उत्तरप्रदेश साठी निघालेल्या एकूण प्रवाशांची संख्या 7196 असली तरीही त्यात दहा वर्षाखालील सुमारे तीनशे मुलांचा समावेश आहे. सुरुवातीला मडगाव वरून उत्तरप्रदेशच्या डोरीया, प्रतापगड, माऊ आणि सहारनपूर जिल्ह्यासाठी गाडी निघणार आहे असे जाहीर करण्यात आले होते. तर मीर्जापूर आणि जॉनपूर जिल्ह्यासाठी करमळी रेल्वे स्थानकावरून दोन गाड्या सुटणार होत्या. मात्र जॉनपूरची  गाडी दुपारी करमळी रेल्वे स्थानकावरून सुटल्या नंतर  मिर्जापुरसाठी जाणारे केवळ आठशेच प्रवाशी करमळीत मागे राहिल्यामुळे मिर्जापूरला जाणारी श्रमिक एक्स्प्रेस मडगाव वरून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वात शेवटीं रात्री दहाच्या दरम्यान मीर्जापूरसाठी मडगाव रेल्वेस्थानकावरून गाडी सोडण्यात आली. स्टेशन इंचार्ज गाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वात शेवटी सुटलेल्या मीर्जापूर गाडीत सुमारे आठशे लोकांना सामावून घेण्यात आले असून सदर गाडीला करमळी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात येणार असून तिथे आणखी आठशे प्रवाशांना घेतले जाणार आहे.

सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, आरोग्य खाते आणि पोलीस खात्याचे कर्मचारी काऊंटरवर नियुक्त करण्यात आले होते.काउंटरवर आल्यानंतर सर्वात प्रथम वैधकीय अधिकार्‍यांकडून प्रवाशांची थर्मल चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर प्रवाशांची नोंदणी करून त्यांना सोशियल डिस्टन्स राखून रेल्वेत बसवण्यात आले. चौदा तास जिल्हा प्रशासनाचे अधिकारी विश्रांती न घेता काउंटरवर उपस्थित होते. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय  परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.

तरी पाच हजारजण अडकून

सायंकाळी उशिरा निघालेल्या मीर्जापूर गाडीत शेवटी अलाहाबाद, आझमगड आणि गाडी जाणार नसलेल्या इतर जिल्ह्याच्या लोकांना समावून घेण्यात आले. सुमारे पाच हजार प्रवाशाना रेल्वेत स्थान न मिळाल्याने ते पुन्हा अडकून राहिले आहेत या सर्वांना पुन्हा नावेलीच्या आश्रय केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती अजित पंचवाडकर यांनी दिली.जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी पुढारीजवळ बोलतांना सर्वाना रेल्वेतून पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण दुसर्‍या जिल्ह्यातील लोक रेल्वे स्थानकावर आल्याने त्यांना पाठवले गेले नाही .पण त्यांच्या साठी लवकरच व्यवस्था केली जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.