Sat, Sep 19, 2020 17:10होमपेज › Goa › मडगावात पार्किंग समस्या जटिल!

मडगावात पार्किंग समस्या जटिल!

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 12:37AM

बुकमार्क करा

मडगाव : प्रतिनिधी 

मडगावात 8 डिसेंबरपासून सुरू असणार्‍या होली स्पिरीट  फेस्तला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. गेले चार ते पाच दिवस येथे येणार्‍या वाहनांसाठी पार्किंग समस्या जटिल होत आहे. या पार्किंग समस्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडीही होत आहे. यामुळे लोकांचे हाल होत असून यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे.

 या फेरीमुळे संपूर्ण कदंब बसस्थानक ते कोलवा सर्कल व आयनॉक्स थिएटरच्या इमारतीखाली वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मडगाव शहरात  पार्किंगचा  मोठा मुद्दा आहे. शहरात येणारे काही व्यावसायिक व नोकरदार  सकाळी एका ठिकाणी आपली चारचाकी किंवा दुचाकी पार्क करतात ती संध्याकाळी काढतात, अशा तक्रारी नागरिक करत आहेत. पार्किंग बेशिस्तपणे नो पार्किंगच्या झोनमध्येही होत आहे. 

होली स्पिरीट चर्च फेस्तला पाच दिवस झाले आहे. पूर्वी कोलवा सर्कलकडून चारही दिशेने रस्त्याच्या फुटपाथवर ही फेरी भरत होती.  मात्र, प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने ही फेरी न्यायालयाच्या आदेशानुसार हटवून  चार वर्षानंतर  एसजीपीडीएच्या मैदानावर भरविण्याचे पालिकेने ठरविले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दरवर्षी फुटपाथवर थाटली जाणारी फेरी दक्षिण गोवा विकास प्राधिकरणाच्या जागेत भरवण्यात आली होती. या जागेसाठी पालिकेला आठ लाख ते अकरा लाख रुपये भाडे शुल्क प्राधिकरणाला द्यावे लागत होते. 

यावर उपाय म्हणून पालिकेने कोलवा सर्कलजवळ मातीच्या भरावाद्वारे जागा तयार केली होती.सर्व नगरसेवकांच्या संमतीने यंदाच्या फेस्ताची फेरी नवीन जागेत भरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर्षी तीन ठिकाणी फेस्तची फे री भरवण्यात आली आहे. एसजीपीडीए मैदानावर घरगुती फर्निचर व इतर मोठ्या वस्तूंची फेरी  आहे. पालिकेच्या मैदानावर कपडे, चप्पल, भांड्यांचे, प्लास्टिक व स्टीलच्या साहित्यांची दुकाने आहेत.  तर तिसर्‍या भाग  असलेला कोलवा सर्कलजवळ खाज्यांची दुकाने मांडण्यात आली आहेत. यंदा पदपथ मोकळे असले तरी त्याच्याकडेला  दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग होत आहे. मुख्य फेरीला एकूण तीन प्रवेशद्वार असून ते सोडल्यास कुठेच पार्किंगसाठी जागा शिल्लक नाही.