होमपेज › Goa › गोव्यात आढळले तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

गोव्यात आढळले तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Last Updated: Mar 26 2020 12:48PM

संग्रहित छायाचित्रपणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात पहिल्यांदाच तीन ‘कोरोना व्हायरस’चे रुग्ण सापडले आहेत. पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या तिघांचे नमुने ‘पॉझिटीव्ह’ मिळाले असल्याचे बुधवारी मध्यरात्री आरोग्य खात्यातर्फे जाहीर करण्यात आले .सध्या तिघांनाही गोमेकॉच्या ‘आयसोलेशन’ वाॅर्ड क्रमांक-131 मध्ये ठेवण्यात आले आहे.

या बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 14 धोकादायक संशयितांना शोधून काढण्यात आले असून त्यांनाही स्वतंत्र विलीगकरणात ठेवण्यात आले असल्याचे आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा यांनी सांगितले. 

या विषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले, की आपल्याला बुधवारी रात्री आरोग्य खात्याकडून राज्यात तीन कोरना बाधित रुग्ण सापडले असल्याचे कळवण्यात आले. या बाधितांना सर्व ते उपचार केले जात असून सर्वाची प्रकृती  स्थिर आहे.  हे तिघेही रुग्ण पुरूष असून ते अनुक्रमे 25, 29 आणि 55 वर्षाचे आहेत. या रुग्णांनी काही दिवसांपूर्वी स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशातून प्रवेश केला असल्याचे उघड झाले आहे.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले असल्याने केंद्र सरकारने जारी केलेले मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जाणार आहे. राज्यातील डॉक्टरांच्या पथकाकडून सदर संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून झटत असून लोकांनी त्यांना सहकार्य करावे. राज्यात प्रयोगशाळा उभारण्याचे काम सुरू असून येत्या दोन दिवसात ती स्थापन केली जाणार आहे.