Fri, Dec 04, 2020 05:20होमपेज › Goa › मानशीत मुलाचा मृत्यू

मानशीत मुलाचा मृत्यू

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 12:59AM

बुकमार्क करा

म्हापसा : प्रतिनिधी 

शालेय क्रीडा स्पर्धांसाठी शारीरिक सराव करून घरी परतणार्‍या काही विद्यार्थ्यांपैकी सहा जणांचा चमू घरी न जाता आकई धामाडे येथील मानशीच्या पाण्यात पोहायला गेला असता अचानक पाण्याची पातळी वाढल्याने  महंमद आशिक माजीद (वय 12, रा. काणका, मूळ तामिळनाडू)  हा बालक बुडून मरण पावला. या बालकांपैकी माशुक खान (12, रा. करासवाडा) हा बालक बुडता बुडता बचावला. अन्य चौघे सुखरूपपणे पोहून बाहेर आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  म्हापसशातील एका विद्यालयाचा क्रीडा महोत्सव दि. 21 रोजी आयोजित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना सकाळी बोडगेश्‍वर मंदिराजवळील   मैदानावर सरावासाठी नेण्यात आले होते. 12 वा. सराव संपवल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना  घरी पाठविण्यात आले. परंतु या विद्यार्थ्यांपैकी सहा जणांचा एक चमू घराकडे न जाता मौजमजेसाठी आकई धामाडे येथील मानशीकडे पोहायला गेला.महंमद माजीद तसेच  माशुक खानसह अन्य चौघे मानशीतील पाण्यात पोहण्यासाठी उतरले. 

विद्यार्थी पोहताना अचानक पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागल्याने महंमद माजीद गटांगळ्या खात बुडाला.  माशुक खान हा प्रवाहाबरोबर दूरवर वाहत जाऊ लागला. वाहत जाताना माशुकने  किनार्‍यावरील एका झाडाच्या फांदीला पकडले. झाडाच्या फांदीला पकडून राहिल्याने माशुक बचावला. मात्र, तो घाबरलेल्या अवस्थेत पाण्यातच राहिला. अन्य चौघेजण पोहून बाहेर आले. त्यांनी  आरडाओरडा केल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जमलेल्यांपैकी एकाने पोलिसांना पाचारण केले. अग्निशमन दलासह उपस्थित लोकांच्या मदतीने झाडाच्या फांदीला पकडून राहिलेल्या माशुक याला बाहेर काढण्यात आले. महंमद याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉमध्येे पाठवून दिला.  दरम्यान, घटनेची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या दुर्घटनेची माहिती शाळेच्या व्यवस्थापनाला मिळाली नव्हती.  पोलिस उपनिरीक्षक परेश रामनाथकर यांनी घटनेचा पंचनामा केला.