Wed, Aug 12, 2020 09:21होमपेज › Goa › ‘अबकारी’ची २६ जणांवर कारवाई

‘अबकारी’ची २६ जणांवर कारवाई

Published On: Jan 30 2018 1:23AM | Last Updated: Jan 30 2018 1:15AMपणजी : प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस सुट्टी आलेल्या ‘विकेंड’ला अबकारी खात्याने टाकलेल्या छाप्यात 26 जणांवर विविध गुन्ह्यांतर्गत   कारवाई करण्यात आली. सर्व तालुक्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली असली तरी सर्वाधिक 12 गुन्ह्यांची नोंद बार्देश तालुक्यात झाली आहे, अशी माहिती खात्याच्या सूत्रांनी दिली. 

खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त असलेल्या सुट्टीनंतर शनिवार व रविवार आल्यामुळे पर्यटकांचा राज्यात ओघ वाढला होता. यामुळे अनेक बार व रेस्टॉरंट, मद्यविक्रेत्यांनी अबकारी नियमांना मोठ्या प्रमाणात फाटा दिला असल्याच्या तक्रारी अबकारी खात्याकडे आल्या. या ‘विकेंड’च्या पार्श्‍वभूमीवर खात्याने आधीपासूनच   सहा भरारी पथकांची स्थापना केली होती. तसेच खात्याच्या सर्व निरीक्षकांना दक्ष राहण्याचा आदेश देण्यात आला होता. 

या पथकांनी आणि निरीक्षकांनी टाकलेल्या विविध ठिकाणावरील छाप्यांमध्ये अबकारी नियमांचा भंग झाला आल्याचे आढळून आले. अधिकृत विक्री परवाना नसताना मद्यविक्री करणे, दिलेल्या मुदतीनंतरही मद्यविक्री करणे, परवाना नसताना संगीत पार्ट्या आयोजित करणे आदी गुन्ह्यांखाली एकूण 26 जणांवर कारवाई करण्यात आली. गुन्ह्यांसंदर्भात बार्देशनंतर पेडणे, काणकोण आणि सासष्टी तालुक्याचा क्रमांक लागतो.