Sun, Aug 09, 2020 11:21होमपेज › Goa › कोव्हिड इस्पितळातील दोन डॉक्टरांना कोरोनाची बाधा?

कोव्हिड इस्पितळातील दोन डॉक्टरांना कोरोनाची बाधा?

Last Updated: Jul 08 2020 1:54AM
मडगाव : पुढारी वृत्तसेवा

मडगावच्या कोव्हिड इस्पितळात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा होण्याचा प्रकार ताजा असताना आता याच इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात सेवा बजावणार्‍या दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हॉस्पिसियो इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.आयरा आल्मेदा यांना विचारले असता, एकच डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती त्यांनी दिली.    
कोव्हिड इस्पितळातील खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा या दोन्ही डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्या डॉक्टरांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याविषयी डॉ.आयरा आल्मेदा यांना विचारले असता त्या म्हणाल्या, की एकाच डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून सध्या त्याची तब्येत सुधारत आहे.दरम्यान, फातोर्डा परिसरात आणखी दोघे जण कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

कोव्हिड इस्पितळात काम करणार्‍या तीन परिचारिका यापूर्वी कोरोनाबाधित झाल्या होत्या. तर  हॉस्पिटलमधील स्वयंपाकघरात काम करणार्‍या चार जणांनाही कोरोनाची बाधा झाली होती. दिवसेंदिवस कोरोना  रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे इस्पितळातील कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आमदार डायस यांची प्रकृती स्थिर

कोरोनाची बाधा झाल्यामुळे कोव्हिड इस्पितळात भरती करण्यात आलेल्या कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. डॉ. आयरा आल्मेदा यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. डायस हे कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना उपचारासाठी कोव्हिड इस्पितळात भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला होता. सोमवारी डायस यांना श्‍वसनाचा त्रास उद्भवला होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे.