Tue, Jul 07, 2020 16:54होमपेज › Goa › सोने घेऊन पळालेल्या युवकास पकडले

सोने घेऊन पळालेल्या युवकास पकडले

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 28 2018 11:56PMकुडाळ ः वार्ताहर

मार्केटमध्ये देण्यासाठी दिलेले सुमारे 53 लाख 48 हजार रु. किमतीचे 1 हजार 800 ग्रॅम सोने घेऊन पळालेला श्रावण दान नाथ (वय 28, रा. भालनी राजस्थान) याला  कुडाळ बसस्थानकात मोठ्या शिताफीने पकडण्यात यश मिळवले. त्याला कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 9 वा.च्या सुमारास घडली. संशयिताला सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आलेे.  त्याच्याकडे सोन्याची बिस्किटे, लॉकेट, चेन अशा वस्तू सापडल्या. 

मडगाव-गोवा येथील संजय विर्नोडकर यांनी मडगाव मार्केटमधील सोने ऑर्डर श्रावण दान नाथ याला द्यायला सांगत त्यासाठी त्याच्याकडे 53 लाख 48 हजार रु. किमतीचे 1 हजार  800 ग्रॅम सोने दिले. मात्र, नाथ हा संबंधित  गिर्‍हाईकाला हे सोने  पोहोच न करता बेपत्ता झाला. त्यानुसार मडगाव पोलिस स्थानकात याबाबत तक्रार देण्यात आली होती. यानंतर  मडगाव पोलिस व संजय विर्नोडकर त्याच्या मागावर होते. यानंतर श्रावण नाथ हा 27  एप्रिल रोजी राजस्थानला जायला निघाला. हा संशयित पणजी-पुणे या शिवशाही बसमधून प्रवास करत असल्याची माहिती संजय विर्नोडकर यांना मिळाली. यानुसार विर्नोडकर यांनी सावंतवाडीतील एका मित्राला याबाबत माहिती देत बसमध्ये तपासणी करण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत ही बस सावंतवाडीतून कुडाळच्या दिशेने रवाना झाली होती. सोने मालकाने मित्राच्या मोबाईलवरील व्हॉटस्अ‍ॅपवर त्याचा फोटोही पाठवला होता.

यानंतर त्याच्या मित्राने आपल्या कुडाळमधील काही मित्रांना याबाबत माहिती व फोटो देत या बसमध्ये त्याची तपासणी करण्यास सांगितले. कुडाळ बसस्थानकात थांबलेल्या शिवशाही बसची तपासणी केली असता या बसमध्ये श्रावण नाथ आढळला. त्याला त्वरित खाली उतरवत त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ ते सोने आढळले. मात्र, श्रावण याने बसस्थानकातच हिसका देत पळण्याचा प्रयत्न केला. येथील नागरिक, रिक्षा चालक यांनी त्याला पळत असताना पकडले व तत्काळ पोलिसांना फोन लावून पोलिसांच्या ताब्यात त्याला दिले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याला याबाबत विचारल्यावर प्रथम त्याने आपण पुणे येथील एका पार्टीला सोने देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने सर्व प्रकार कबूल करत सोने पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी प्रभारी पोलिस निरीक्षक सुधीर शिंदे, हवालदार पी.जी. मोरे, एन.पी. नारनवर, सायमन डिसोजा  या  पोलिसांनी त्याला ताब्यात  घेवून इतर माहिती घेत त्याची झाडझडती घेतली. आपल्याला बसस्थानकातून फोन आल्यावर आपण बसस्थानकात जात त्याला ताब्यात घेतल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. शनिवारी श्रावण नाथ याला सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले.