Wed, Aug 12, 2020 20:59होमपेज › Goa › साळ येथे तीन घरे आगीत खाक; कुटुंबे उघड्यावर

साळ येथे तीन घरे आगीत खाक; कुटुंबे उघड्यावर

Last Updated: Mar 27 2020 1:27AM
डिचोली/साळ : पुढारी वृत्तसेवा 

डिचोली तालुक्यातील साळ वरचा वाडा येथे गुरुवारी सकाळी लागलेल्या आगीत तीन झोपडीवजा घरे भस्मसात झाली. तिन्ही घरांतील कुटुंबीयांचे सर्व कपडे, भांडी, अन्नधान्य, महत्त्वाची कागदपत्रे व रोख रक्‍कम जळाली असून दागिन्यांचा शोध घेतला जात आहे. दोन दागिने आगीची झळ लागल्याच्या स्थितीत मिळाले असून इतर दागिन्यांचा शोध सुरू आहे. तिन्ही घरे जळाल्याने संपूर्ण नुकसानीचा आकडा 15 ते 16 लाख रुपये इतका असू शकतो, असा प्राथमिक अंदाज आहे.

प्रकाश गोविंद तारी, नवनाथ गोविंद तारी, कृष्णा गोविंद तारी व पांडुरंग गोविंद तारी या चार भावंडांची ही घरे होती. आपल्या कुटुंबीयांसमवेत जवळजवळ घरे बांधून राहत होते. गुरुवारी सकाळी चहा वगैरे घेऊन दुपारचे जेवण बनविण्यासाठीची लगबग सुरू होती. घटना 9.30 ते 9.45 वाजण्याच्या सुमारास घडली. सदर घरची महिला अंगणात दुसर्‍या कामात व्यग्र होती. अचानक छताला आग लागल्याचे तिच्या द‍ृष्टीस पडले. आरडाओरड सुरू झाल्याने परिसरातील लोक धावले. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले.

शेखर सोमा राऊत यांनी माहिती मिळताच अग्निशमन दलाला दूरध्वनीवरून संपर्क साधला नि अवघ्या 18 मिनिटांत अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत तीनही घरे जळून गेली. अग्निशमनचे जवान पोहोचले त्यावेळी तिसरे घरही जळत होते. बघताबघता सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. वार्‍याचा झोत, दुपारची वेळ, कडक उन्हे आणि झावळ्यांचे छत त्यामुळे काही मिनिटांतच होत्याचे नव्हते झाले. दलाच्या जवानांनी पूर्णपणे प्रयत्न केले. अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश साळकर, आर. आर. परब, आर. टी. गावस, रामचंद्र मळीक, साईनाथ केसरकर, रूपेश गवस, बाबुराव गावस व रूपेश पळ या जवानांनी आग विझवली.साळचे पंचायत सदस्य प्रकाश राऊत हे घटनास्थळी पोहोचून मामलेदार प्रविणजय पंडित, सरपंच घनश्याम राऊत व तलाठी राजन नाईक यांना दूरध्वनीवरून घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावेळी पंचायत सदस्य वासुदेव हळर्णकरही उपस्थित होते.

दिनेश राऊत व अनिकेत राऊत या युवकांनी जीव धोक्यात घालून जळत्या घरातील भरलेले गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला. दोडामार्ग पोलिस स्थानकातील हवालदार कृष्णा नाईक तसेच पोलिस हरी राऊत, गौरेश गवस, दिलेश हळदणकर, शुभम गवस घटनास्थळी पोहचल्यावर आगीवर नियंत्रण मिळवले. हवालदार कृष्णा नाईक यांच्या देखरेखीखाली झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे. आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. वीज खात्याचेही कर्मचारी देविदास राऊत व उमेश रेडकर घटनास्थळी पोहोचले आणि घरांना होत असलेला वीज पुरवठा खांबावरून खंडित केला. मेघश्याम राऊत, शेखर राऊत, तुषार राऊत, विठ्ठल राऊत, पंचायत सदस्य प्रकाश राऊत, वासुदेव हळर्णकर यांनी उपस्थित युवकांच्या साथीने मदतकार्य सुरू केले.