राज्यात कोरोनाचे तीन रुग्ण

Last Updated: Mar 27 2020 1:24AM
Responsive image


पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात ‘कोरोना  व्हायरस’बाधित तीन रुग्ण सापडले असून ते तिन्हीही विविध मतदारसंघांतील असल्याने धोका वाढला आहे. पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या या तिघांच्या रक्‍त व थुंकीच्या नमुन्यांच्या चाचणीत ते कोरोना ‘पॉझिटिव्ह’ सापडले आहेत. सध्या तिघांनाही सरकारी इस्पितळात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. या बाधित व्यक्‍तींच्या संपर्कात आलेल्या 17 धोकादायक संशयितांना शोधून काढण्यात आले असून त्यांनाही विविध सरकारी इस्पितळांतील स्वतंत्र विलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावर उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, आपल्याला बुधवारी रात्री आरोग्य खात्याकडून राज्यात तीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले असल्याचे कळवण्यात आले. या कोरोनाग्रस्तांवर सर्व आवश्यक ते उपचार केले जात असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 17 लोकांची माहिती घेण्यात आली असून त्यांना राज्यातील विविध सरकारी इस्पितळांतील ‘आयसोलेशन’ वॉर्डमध्ये ठेवण्यात आले असून ते देखरेखीखाली आहेत. 

सावंत म्हणाले की, राज्यात कोरोना व्हायरसच्या बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने राज्यात विविध भागात आणखी स्वतंत्र ‘आयसोलेशन’ वॉर्ड उघडण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. सध्या घरातच सुमारे 1500 पेक्षा अधिक लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ते अन्य लोकांच्या संपर्कात आल्याचे आढळून आले आहे. याशिवाय, 22 मार्च रोजी कर्फ्यू लागू केल्यानंतर परराज्यात असलेले सुमारे 2500 गोमंतकीय आतापर्यंत राज्यात परतले आहेत. जर आणखी बाधित रुग्ण सापडले तर हेच लोक त्याला जबाबदार ठरणार असून ही धोक्याची घंटा आहे. यामुळे त्यांनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी व घराबाहेर पडू नये, अशी आपण हात जोडून कळकळीची विनंती करत आहे, असे ते म्हणाले.

आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा यांनी गुरूवारी सांगितले.की, राज्यातील ‘कोरोनाव्हायरस’चे तिघेही रुग्ण पुरूष असून ते अनुक्रमे 25, 29 आणि 55 वर्षांचे आहेत. हे रुग्ण काही दिवसांपूर्वी स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांतून आले असल्याचे उघड झाले आहे. सध्या गोमेकॉत-10, मडगावच्या टीबी इस्पितळात-6, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात-2, फोंड्याच्या इस्पितळात-9, चिखली इस्पितळात-3 असे मिळून 30 संशयित रुग्ण आहेत. 

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले की, राज्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडले असल्याने केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जाणार आहे. राज्यातील डॉक्टरांचे पथक सदर संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून झटत असून लोकांनी त्यांना सहकार्य करावे. राज्यात प्रयोगशाळा उभारण्याचे काम सुरू असून येत्या दोन दिवसांत ती स्थापन केली जाणार आहे.