Tue, Jul 07, 2020 17:35होमपेज › Goa › ‘मिशन सालसेत’ची गरज नाही : मुख्यमंत्री

‘मिशन सालसेत’ची गरज नाही : मुख्यमंत्री

Published On: Apr 09 2019 1:56AM | Last Updated: Apr 09 2019 1:49AM
पणजी : प्रतिनिधी

लोकांना स्थिर सरकार हवे असून फक्‍त भाजपच स्थिर सरकार देऊ शकत असल्याचा विश्‍वास मतदार दाखवत आहेत. राज्यातील अल्पसंख्याक मतदारही नेहमीच भाजपसोबत असल्याने त्यांना वेगळे वागवले जाणार नाही. ‘सबका साथ सबका विकास ’ हे आमचे ध्येय असून सासष्टीमधील सूज्ञ मतदार देशाचे हित बघून भाजपला यावेळीदेखील साथ देणार आहेत. यामुळे यंदा ‘मिशन सालसेत’ची गरज पडणार नसल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, भाजपने प्रचारात आघाडी घेतली असून घटक पक्षांची भक्कम साथ आम्हाला लाभत आहे. भाजपच्या विरोधात उत्तर गोव्यात उभ्या राहिलेल्या उमेदवारामध्ये दम नाही. फ्रान्सिस सार्दिन दोनवेळा खासदार झाले असले तरी त्यांना मागील 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनेच नाकारले होते. विकासकामांचे नियोजन नसल्यानेे सार्दिन यांच्या खासदार निधीतील सुमारे 60 टक्के निधी परत केंद्राला पाठवण्यात आला होता. सावईकर यांनी गेल्या पाच वर्षांत खासदार निधीचा शंभर टक्के वापर करून आपली कार्यक्षमता सिद्ध केलेली आहे. दक्षिण गोव्यात नरेंद्र सावईकर हे सक्रिय असून त्यांनी खासदार निधीतून लोकांची अनेक कामे केली आहेत. तर उत्तर गोव्यात राहणारा लायक उमेदवार सापडत नसल्याने काँग्रेसने दक्षिण गोव्यातला उसना उमेदवार आणला आहे. गिरीश चोडणकर हे याआधी फातोर्डा, पणजी विधानसभेत हारले असून आता लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांना दारूण पराभव स्वीकारावा लागणार आहे.  

मगो-काँग्रेसचे ‘फिक्सिंग’ : सावंत

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पोटनिवडणुकांमध्ये  मगो आणि काँग्रेसच्या ‘फिक्सिंग’मुळे मतदार संभ्रमात पडले आहेत. मगोने अपक्ष उमेदवाराला दिलेल्या छुप्या पाठिंब्यामुळे मांद्रेचा काँग्रेसचा उमेदवार बळीचा बकरा ठरणार आहे. असाच प्रकार शिरोडा मतदारसंघात होणार असून महादेव नाईक यांचा दारूण पराभव होणार आहे. म्हापशामधून भाजपचा उमेदवार जोशुवा डिसोझा भरघोस मतांनी निवडून येण्याचा विश्‍वास आहे.