Thu, Jul 09, 2020 23:21होमपेज › Goa › मालमत्ता तपशील न देणार्‍या आठ आमदारांची नावे जाहीर

मालमत्ता तपशील न देणार्‍या आठ आमदारांची नावे जाहीर

Published On: Dec 28 2018 1:17AM | Last Updated: Dec 28 2018 1:17AM
पणजी : प्रतिनिधी

लोकायुक्त कायद्यानुसार मालमत्तेचा तपशील सादर करण्याच्या मुदतीत वाढ करूनही राज्यातील काँग्रेसचे 5, भाजपचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक अशा  एकूण  8 आमदारांनी अजूनही  मालमत्ता तपशील न दिल्याने लोकायुक्त कार्यालयाने  कडक पाऊल उचलले असून त्यांची नावे उघड केली आहेत. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर,  फ्रान्सिस सिल्वेरा, कार्लुस आल्मेदा, माजी आमदार सुभाष शिरोडकर, इजिदोर फर्नांडिस, आलेक्स रेजिनाल्ड, विल्फ्रेड डिसा आणि चर्चिल आलेमाव यांनी मालमत्तेचा तपशील दिला नसल्याचे पत्र लोकायुक्तांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना गुरूवारी पाठवले.
लोकायुक्त कार्यालयाचे निबंधक लक्ष्मण जल्मी यांच्याकडून गुरूवारी सदर आठ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल सिन्हा यांना पाठवण्यात आली आहे. ‘गोवा लोकायुक्त कायदा’च्या कलम 21 (2) अन्वये सदर नावे राज्यातील दोन वर्तमानपत्रांतही जाहिरातीद्वारे उघड करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

‘गोवा लोकायुक्त कायदा- 2011’ च्या तरतुदीनुसार, राज्यातील  आमदार, मंत्री, पंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष सर्व लोकप्रतिनिधींनी दरवर्षी 31 मार्च पर्यंतचा मालमत्ता अहवाल 30 जूनपर्यंत लोकायुक्तांना सादर करायचा असतो. मात्र, ही मुदत अपुरी असल्याचे कारण देऊन लोकप्रतिनिधींनी मुदत  वाढवून घेतली   होती. त्यासाठी राज्य विधानसभेच्या जुलै महिन्यात पार पडलेल्या अधिवेशनात लोकायुक्त कायद्यात दुरूस्ती करण्यात आली. या दुरूस्तीनुसार लोकप्रतिनिधींना मालमत्तेचा हिशोब सादर करण्याची असलेली 30 जूनची मुदत वाढवून 5 नोव्हेंबर करण्यात आली होती. या वाढीव मुदतीतही अनेक आमदार, पंचायत सदस्यांना हिशोब सादर करण्यात अपयश आल्याने लोकायुक्त कार्यालयाने यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. 
आमदारांची यादी जाहीर केल्यानंतर लवकरच पंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष आदींचीही नावे वर्तमानपत्रात जाहीर केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.