Thu, Jul 09, 2020 23:03होमपेज › Goa › पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप

पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप

Published On: Sep 07 2019 2:02AM | Last Updated: Sep 07 2019 2:02AM
पणजी : प्रतिनिधी 

राज्यात पाच दिवस घरोघरी मोठ्या भक्‍तिभावाने पूजलेल्या श्री गणेशमूर्तींचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषात व ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. राज्यातील विविध ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. 

राज्यात दीड दिवस, पाच, सात, नऊ व अकरा म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत श्री गणेशमूर्तींचे घरोघरी पूजन केले जाते. सोमवारी श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, पूजा करण्यात आली होती. पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे शुक्रवारी संध्याकाळी उत्तर पूजेनंतर विसर्जन करण्यात आले. संध्याकाळी 7 वाजल्यापासून भाविकांनी विसजर्र्नस्थळी श्रीमूर्ती आणण्यास सुुरुवात केली होती. फटाक्यांचा धुमधडाका, आरत्या व दिंडीच्या गजरात बाप्पाला विर्सजनस्थळी आणण्यात आले. त्यानंतर घुमटवादन, भजन, कीर्तन झाल्यानंतर श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. पणजी, म्हापसा, डिचोली, पेडणे, काणकोण, वाळपई, फोंडा, सांगे, केपेसह ग्रामीण भागात काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका जल्लोषात चालू होत्या. पणजी परिसरातील भाविकांनी फेरीबोट धक्‍का, मळा येथील चार खांब, मिरामार किनार्‍यावर मूर्ती विसर्जन केले. ग्रामीण भागात ओहोळ, नद्या, विहिरींमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.