Mon, Sep 21, 2020 18:42होमपेज › Goa › गोळावलीत मृत वाघाची गायब नखे अखेर सापडली

गोळावलीत मृत वाघाची गायब नखे अखेर सापडली

Last Updated: Jan 22 2020 2:10AM

वाळपई : गोळावली येथील देवस्थानच्या प्रांगणात सापडलेल्या वाघाच्या नखांचा पंचनामा करताना तपास यंत्रणेचे प्रमुख नंदकुमार परब. सोबत विलास गावस व इतर कर्मचारी.वाळपई : प्रतिनिधी

सत्तरी तालुक्यातील गोळावलीत मृत पावलेल्या 4 वाघांपैकी एका वाघाच्या गायब झालेल्या नखांचा 5 जानेवारीपासून सुरू असलेला शोध 15 दिवसांनी अखेर मंगळवारी सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात एका संशयास्पद पिशवीत नखे आढळल्यामुळे थांबला. यासंदर्भात कुणालाही अद्याप अटक करण्यात आली नसली तरीही प्राप्त माहितीनुसार अनेकांना यासंदर्भात ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती तपास यंत्रणेच्या सूत्रांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार नैमितिक पूजेसाठी आलेले पुजारी देमको खोत मंगळवारी नेहमीप्रमाणे देवस्थानच्या प्रांगणात आले असता त्यांना गर्भकुडीशेजारी एक संशयास्पद पिशवी आढळली. याबाबतची माहिती त्यांनी आपले बंधू नारायण खोत यांना दिली असता त्यांनी इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत वनखात्याचे कर्मचारी व स्थानिक भागातील नागरिक प्रेमकुमार गावकर यांना माहिती दिली. गावकर यांनी संशयास्पद पिशवीसंबंधीची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्यानंतर नंदकुमार परब, विलास गावस व इतर कर्मचार्‍यांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यात वाघ नखे असल्याचे आढळून आले.

दरम्यान, नखाबाबतचा संशय बळावल्यानंतर पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांंनी श्वानपथक मागवले. सर्वप्रथम श्वानपथकाला मंदिराच्या प्रांगणात आणल्यानंतर श्वानपथक सरळ देवस्थानापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या एका नव्याने बांधण्यात येत असलेल्या टाकीजवळ घुटमळले. 

दरम्यान, देवस्थानच्या प्रांगणात सापडलेली नखे पंचनामा करून ताब्यात घेतली. यावेळी ठाणे पंचायतीच्या सरपंच प्रजिता गावस उपस्थित होत्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तपास अधिकारी नंदकुमार परब यांनी सांगितले की, देमकोे खोत यांनी सदर संशयास्पद पिशवीबाबत माहिती दिल्यानंतर वाघ नखे ताब्यात घेतलेली असून या प्रकरणात कुणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून चौकशी सुरू आहेे. 

 "