Mon, Nov 30, 2020 13:26भंडारी समाजाच्या बैठकीत म्हापशामध्ये हमरीतुमरी

Last Updated: Nov 25 2020 1:24AM
बार्देश : पुढारी वृत्तसेवा

प्रगती संकुल या समाजमंदिराच्या बांधकामाच्या हिशेबात आर्थिक अनियमितता असल्याच्या कारणावरून बार्देश तालुका भंडारी समाजाच्या रविवारी झालेल्या सभेत जोरदार हमरीतुमरी झाली. ही सभा नव्याने बांधलेल्या प्रगती संकुलामध्ये झाली. समाजबांधवांनी सभागृह खचाखच भरलेले होते. हमरीतुमरीमुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर याठिकाणी पोलिसांना पाचारण करावे लागले. 

येथील बोडगेश्वर मंदिराच्या परिसरात प्रगती संकुल उभारलेले आहे. येथे झालेल्या सभेस भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक नाईक, बार्देश भंडारी समाजाचे अध्यक्ष सुधीर कांदोळकर, शिवोलीचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री विनोद पालयेकर, साळगावचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री जयेश साळगावकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर, माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, महिला अध्यक्षा शुभांगी वायंगणकर आदी उपस्थित होते. 

समाज मंदिराच्या बांधकामाच्या हिशेबात आर्थिक अनियमितता असल्याची तक्रार उपस्थितांनी केली. मंचावरील नेते मंडळींना लोक बोलू देत नव्हते. गोंधळ इतका वाढला होता की, कोण काय बोलतेय ते काहीच कळत नव्हते. कोणी नेता बोलू लागला, काही समजावून सांगू लागला, हात जोडू लागला तर लोक मंचाजवळ जाऊन त्याला मज्जाव करत होते. ध्वनिक्षेपकाची व्यवस्था असलेला पोडियम लोक हिसकावून घेत होते. लोक गटागटाने मंचाजवळ येऊन संतप्त स्वरात बोलत असल्याचे दृश्य वारंवार पहायला मिळाले. काही महिलाही सभेला उपस्थित होत्या. त्यांनी मंचापासून, गोंधळापासून दूर राहणेच पसंत केल्याचे जाणवले. अखेर या गोंधळातच प्रगती संकुलाच्या हिशेबास मंजुरी देण्यात आली. 

नोकर्‍या नसल्याने ज्ञाती बांधवांमध्ये संताप

सभेत एक ज्ञाती बांधव मोठ्यांदा म्हणाले की, अरे, आम्ही याला निवडून दिला. हा आम्हाला सांगतोय? आमच्या मुलांना कुणालाही नोकर्‍या मिळत नाहीत आणि हा आम्हाला शिकवतोय, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.