Thu, Nov 26, 2020 21:21दिल्लीहून येणार्‍यांसाठी नव्या एसओपीचा विचार

Last Updated: Nov 23 2020 2:05AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे दिल्लीहून गोव्यात येणार्‍या प्रवाशांसाठी नवी मानक प्रक्रिया प्रणाली (एसओपी) लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.  महाराष्ट्र सरकारने दिल्लीहून येणार्‍या लोकांना नवी एसओपी लागू  केल्याचे ते म्हणाले. 

राणे म्हणाले, ‘आरोग्य सचिवांना पत्र पाठवले असून त्यांना महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांशी या विषयावर चर्चा करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राकडून दिल्ली येथून येणार्‍या लोकांबाबत कोणती पावले उचलली जात आहेत, यावरही अभ्यास करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.’

ते पुढे म्हणाले की,  दिल्लीहून येणार्‍या लोकांना कठोर एसओपी लागू केली जाणार नाही; मात्र  विमानतळावर कोणती एसओपी लागू  केली आहे  व दिल्ली येथून  येणार्‍यांसाठी कोणती लागू केली जाऊ शकते, हे पाहणे आवश्यक आहे. सरळ व सुटसुटीत अशी एसओपी लागू करण्यावर काम केले जाईल.विमानतळासाठी नवी एसओपी तयार केली जाऊ शकते; मात्र रेल्वेबाबत एसओपी तयार करण्याबाबत सरकार अनभिज्ञ आहे. 

राज्यात डिसेंबर महिन्यात नाताळ व नववर्षानिमित मोठया संख्येने गोव्यात पर्यटक येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील महिन्यात पर्यटकांची गर्दी असेल.या दिशेनेही हे आवश्यक आहे. छठपूजेनंतर आता परप्रांतीय मजूर पुन्हा गोव्यात दाखल होण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे या परप्रांतीय मजुरांवर देखरेख ठेवण्यासाठी एसओपी तयार करण्याची गरज भासणार आहे.

आयसोलेशन किट वाटप मोहीम उपयुक्त

गोवा सरकारकडून लागू करण्यात आलेल्या होम आयसोलेशन किटबाबत केंद्र सरकारने तपशील मागितला आहे. अशा प्रकारची  किट वाटप मोहीम ही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त ठरली असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.